हृदयस्पर्शी मदतीचा हात ; १४ बालकांना मिळाले नवजीवन
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात अनोखी आरोग्य गुढी
29 March, 2025
सातारा दि.२९:- गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांसाठी वैद्यकीय उपचार घेणे म्हणजे मोठे संकटच. विशेषतः जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांच्या कुटुंबांसाठी ही समस्या आणखीच गंभीर ठरते. एका अहवालानुसार आपल्या देशात साधारणतः ३% कुटुंब महागड्या आरोग्य खर्चामुळे दारिद्र्यरेषेखाली ढकलले जात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. मात्र, सातारा जिल्ह्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्यारूपाने लाभलेल्या संवेदनशील नेत्यामुळे १४ निष्पाप बालकांना नवजीवन मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या पुढाकाराने आणि श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॅार चाईल्ड हार्ट केअर, खारघर, नवी मुंबई येथील निष्णात ह्रदय रोग तज्ञांच्या मदतीने १४ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आणि ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने साताऱ्यात अनोखी आरोग्य गुढी उभारण्यात आली!
संवेदनशीलतेतून पुढाकार -विलासपूर (सातारा) येथे राहणाऱ्या रोहित चव्हाण यांच्या चार महिन्यांच्या मुलीला हृदयविकार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र मोलमजुरी करून तुटपुंज्या मिळकतीवर कुटूंबाची कशीबशी गुजराण करणाऱ्या चव्हाण यांना लहानग्या मुलीच्या उपचारांसाठीचा येणारा लाखो रुपयांचा खर्च परवडणारा नव्हता. ही बाब मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कानावर फिरोज पठाण यांच्या मार्फत घातली गेली आणि त्यांनी त्वरित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून (रूपये १ लाख) मदत उपलब्ध करून दिली. मानवतेच्या दृष्टीकोनातून एस.आर.सी.सी. चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई यांच्या प्रशासनाशी समन्वय साधला आणि रूग्णालय प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळेच रूग्णालयाच्या निष्णात डॉक्टरांकडून तिच्यावर मोफत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. ती लहानगी आता आरोग्यदृष्टया सुरक्षित असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सहृदयतेने भारावलेले चव्हाण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
हा एका बालकाचा प्रश्न नव्हता. जिल्ह्यात असे अनेक बालक आहेत, ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे, मात्र आर्थिक मर्यादांमुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. हे लक्षात घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या मंत्री कार्यालयास सूचित करून जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात निर्देश दिले. ८ मार्च रोजी सिव्हिल हॉस्पिटल,सातारा येथे श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॅार चाईल्ड हार्ट केअर येथील ह्रदय रोग तज्ञ आणि त्यांच्या टीमने ८४ बालकांची 2D ECO तपासणी केली. त्यामध्ये ४ दिवसांच्या बालकापासून ते १८ वर्षांच्या तरूणांचा समावेश होता. यातील २० जणांवर हृदय शस्त्रक्रिया हाच पर्याय होता. यास्तव कर्तव्य सोशल ग्रुप आणि श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॅार चाईल्ड हार्ट केअर यांच्या समन्वयाने रूग्णालयाच्या निष्णात तज्ञ डॉक्टर्स कडून १४ जणांवर यशस्वीपणे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. दि. १९ मार्चला सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथून श्री सत्यसाई संजीवन हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई येथे पोहोचण्यासाठीची वाहन व्यवस्था कर्तव्य ग्रुपाच्या वतीने उपलब्ध करून दिली. याप्रसंगी १ महिन्याच्या बालकापासून ते ८ वर्षाच्या १४ बालकांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. उर्वरित ६ बालकांवरही नजीकच्या काळात मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
आरोग्य सेवेचा नवा अध्याय -सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील अंगणवाडी स्तरावर कर्तव्य सोशल ग्रुप, श्री सत्यसाई संजीवन रूग्णालय,नवी मुंबई व जावली तालुका प्रशासन यांच्या समन्वयातून आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात ० ते ६ वयोगटातील बालकांची टप्प्याटप्प्याने वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात 2D ECO तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार केला जाणार आहेत. पहिले आरोग्य तपासणी शिबिर २२ मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ व सोमर्डी येथे पार पडले. त्यामध्ये ६०० हून अधिक बालकांची आरोग्य तपासणी व आवश्यक ते औषधोपचार श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर, खारघर, नवी मुंबई यांच्या तज्ञ डॅाक्टर कडून करण्यात आले. लवकरच 2D ECO तपासणी करण्यात येणार असून व आवश्यक त्या रूग्णांवर हृदय शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.
दुसरे आरोग्य शिबीर दिनांक ५ एप्रिल रोजी मेढा व केळघर येथे आयोजित करण्यात आले आहे. तेथेही 2D ECO तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार केला जाणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखालील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत मिळवून देण्याचे महत् कार्य अत्यंत चोखपणे पार पाडले जात आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने रूग्णांना यामाध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून दिली आहे. गेल्या तीन महिन्यांतच त्यांच्या पुढाकाराने २५ लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांसाठी मंजूर करण्यात आली असून रूग्णांवर वेळेत उपचार देखील होत आहेत.
आजच्या काळात संवेदनशील राजकारणाची गरज विकासकामांबरोबरच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत गरजांमध्ये आरोग्यसेवाही सर्वांत महत्त्वाची ठरत आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात उभारलेल्या या आरोग्य गुढीमुळे गरजू रुग्णांना नवा हक्काचा आधार मिळाला आहे. समजाप्रती असलेल्या संवेदनशील राजकारणाचे हे उत्तम उदाहरण असून, अशा पुढाकारांचे लोकार्पण केवळ साताऱ्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हावे, अशी जनभावना आहे.