single-post

या ढाण्या वाघामुळे आम्हाला पाणी मिळाले

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मृतिदिन

22 March, 2025

                             आज कोणीही श्रेय लाटण्याचे  काम करू द्या पण... महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील उपेक्षित भागातील शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळाले ते क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी या ढाण्या वाघाच्या अथक प्रयत्नांमुळे 

                                     स्वातंत्र्योत्तर काळात सरंजामी नेत्यांनी त्यांच्या सोयीचे जलसिंचन प्रकल्प पूर्ण केले पण उपेक्षित वंचित अल्पभूधारक शेतकरी वर्गाच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अपवाद वगळता कोणी आवाज उठवत नव्हते त्यावेळेस नागनाथअण्णा गरिबांचा वाली पुढं आला.

                                        भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आण्णाचे योगदान मोलाचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, सहकार, कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. 

                                       आज नागनाथअण्णा यांनी स्थापन केलेला साखर कारखाना उत्तम पारदर्शक शेतकरी हिताचा कारखाना म्हणून लोकप्रिय आहे. उत्तम भाव देणारा कारखाना आहे. आण्णांनी कारखान्याचे उत्पन्न/नफा कुटुंबासाठी वापरला नाही, तर त्या नफ्यातून त्यांनी पाणी परिषदा घेतल्या.

                                    आण्णांनी कारखान्याच्या नफ्यातून सोलापूर, सांगली, सातारा इत्यादी दुष्काळी भागात पाणी परिषदा घेवून जन आंदोलन सुरू केले, यासाठी त्यांना लोकनेते गणपतराव देशमुख, डॉ. भारत पाटणकर इत्यादींनी मोलाची साथ दिली. आम्ही कॉलेज जीवनात असताना त्या परिषदांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे सरकारला जाग आली आणि त्यातूनच भीमा-सीना जोड कालवा, टेंभू, म्हैसाळ, ताकारी, सिना-माढा उपसा सिंचन योजना इत्यादी योजना आल्या.

                                आण्णांनी एकूण तेरा दुष्काळी तालुक्यात पाणी परिषदा घेतल्या. पाणी प्रश्न ऐरणीवर आणून तो सोडविण्याचे ऐतिहासिक  काम आण्णांनी केले. आण्णांच्या या योगदानाबद्दल सांगली जिल्हा परिषदेने टेंभू योजनेला क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा महत्त्वूर्ण निर्णय घेतला आहे. त्याबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे अभिनंदन.

                                 आण्णांच्या योगदानामुळे आज हरित क्रांती झाली. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी आले. आण्णांनी प्रागतिक विचारांच्या चळवळीला मोठा आधार दिला. त्यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांना स्मृतिदनानिमित्त विनम्र अभिवादन!

*- डॉ. श्रीमंत कोकाटे*