single-post

दि.१९ मार्च ला महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध 'बावधन भैरवनाथ बगाड यात्रा'

बावधन बगाड यात्रेचा बगाड्या ठरला, 'या' व्यक्तीला मिळाला 'मान'

14 March, 2025

बावधन दि.१३ (सुरेश बोतालजी संपादक यांच्या कडून): होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्रित जमत असतात या ठिकाणी भैरवनाथला नवस बोललेल्या लोकांचा रात्री १२ वाजता देवाला कौल लावला जातो आणि बगाड्या ठरवला जातो,  या वर्षी बावधन यात्रेतील बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे  यांना मिळाला आहे.भैरवनाथाचे पुजारी बाळासाहेब क्षीरसागर हे देवाला कौल लावतात.पुजारी क्षीरसागर यांची हि तिसरी पिढी भैरवनाथ देवाची सेवा करीत आहेत.दि.१९ मार्च ला बावधन बगाड यात्रा होत आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा बावधन गावी भरवली जाते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज भारतात येण्या अगोदरपासूनच  बावधनमध्ये बगाड यात्रा उत्साहात भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ सव्वा महिन्या पासून अगोदर तयारी  होत असते.

बगाड्याचा मान मिळाल्यानंतर बघाडयाला भैरवनाथाच्या मंदिरात पाच दिवस ठेवले जाते तसेच त्याच्या हस्ते पाच दिवस देवाची पूजा केली जाते.यावर्षी बगाडया होण्याचा मान अजित ननावरे यांना मिळाल्यामुळे बावधन गावात उत्साहाचे वातावरण आहे.

भावाचे लग्न व्हावे यासाठी काळभैरवनाथ यांना अजित ननावरे यांनी भैरवनाथ देवाला नवस केला होता तो नवस पूर्णत्वास गेल्यामुळे व नवसपूर्ती करण्यासाठी यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान ननावरे यांना मिळाला आहे. 

बावधन बगाड यात्रेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक हजेरी लावत असतात.

 गावात नाथपंथीय धनगरांची वस्ती, कांबळे वस्ती  भिंताडे, भोसले, पिसाळ, कदम आणि दाभाडे तसंच बारा बलुतेदार, अलुतेदार सर्व जाती-धर्माच्या लोकांची वस्ती गावा मध्ये  गुण्यागोविंदाने एकत्र राहतात,या बावधन गावात जातीभेदाला थारा  नाही, बावधन हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. "काशिनाथाचे चांगभलं"च्या आरोळीच्या निनादात सर्व कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. 

आज ही बावधन गावा मध्ये शिवकालीन चावडी आहे.  गावात विविध जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात सर्व लोक एकत्र समान भूमिकेतून सामील होतात. भैरवनाथ बगाडयाचा उत्सव साजरा करत असताना, बगाड उत्सवासाठी सर्व जबाबदारी सर्व जातीधर्मामध्ये विभागलेली जाते. सर्व मंडळी न चुकता आपली जबाबदारी पार पडत  असतात,हे या यात्रेचे  सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, कोणत्याही संकट समयी  बावधन  गावातील ग्रामस्थ एकसंघ असतात, 

  बगाड म्हणजे बैलांनी ओढला जाणार गाडा. दगडी चाके असलेला रथ, बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल  तीन ते चार टन इतके असते. बगाडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, मग येतो खांबावर शीड अशी एकंदरीत बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला म्हणजेच रथाच्या टोकाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. 

माघ पौर्णिमेला बावधनमध्ये एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळतो. कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेला प्रारंभ होतो. यादिवशी धनगर बांधवांकडून काशिनाथाच्या चरणी मानाची घोंगडी अर्पण करतात. त्याचप्रमाणे गावकरी बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळक तोडतात. यावेळी अबालवृद्ध कळक ओढण्यासाठी उपस्थित असतात. बावधन गावच्या बगाड वाघल्यासाठी लागणारी बाभळ पाडळी ता.कोरेगावातून आणलेली आहे. पाडळी गावातील शेतकऱ्यांनी  ही बाभळ आनंदाने नाथ साहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. 

धुलीवंदनाच्या दिवशी गावातील भोई समाजातील युवक ग्रामस्थांच्या मदतीने गावच्या  विहिरीत वर्षभर ठेवलेली बगाडाची सर्व लाकडं पाण्यात बुडी देऊन बाहेर काढतात.  बाभळीचा चिवटपणा हा गुणधर्म कायम राहावा यासाठी ही लाकडे विहिरीत ठेवली जातात. सुतार मंडळी या लाकडांची पाहणी करून जुने-नवे लागणारे बगाडाचे भाग तयार करतात.बागडाच्या गाड्यावर मधला खांब उभा करण्यासाठी एक मोठं चौकोनी लाकूड असतं. त्यामध्ये उभा खांब बसवला जातो. बगाडाच्या गाड्यांमध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचा भाग म्हणजे वाघाला! त्या लाकडाला वाघाला असं म्हटलं जातं. त्याला पुढच्या बाजूला वाघाच्या तोंडाचा आकार दिलेला असतो. बगाड म्हणजे साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथाचा रथ ! शंकराचं आसन व्याघ्रासन असतं म्हणून या रथावरील महत्त्वाच्या लाकडाला पुढच्या बाजूला वाघाचं तोंड कोरलेलं असतं. साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथ या व्याघ्रासनावर बसून येतात, अशी लोकांची धारणा आहे.

बावधन गावाची बगाड यात्रा रंगपंचमी या दिवशी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा. विवाहातील मुख्य विधी म्हणजेच हळद. या दिवशी  हळदी समारंभ गावातील सुवासिनीच्या हस्ते केला जातो. यावेळी नाथाला हळद लावली जाते. त्याचप्रमाणे गावातील बारा बलुतेदार आणि मानाच्या सुहासिनी देवाला हळद लावतात. याच दिवशी मानाचे पान लागलेला नाभिक समाजबांधव दिवटीचे धारदार टोक मनगटावर टोचतात आणि काठ्या नाचवत मंदिरात आणतात. प्रतिवर्षी गावचे लोहार एक मानाचा नाल मंदिरातील खांबाला ठोकतात. बगाडाच्या आदल्या दिवशी छबिना, पालखीचे मिरवणूक व बगाड बांधण्यात येते. हे बगाड पहाटे सोमेश्वरच्या दिशेने निघते. तेथे बगाडयाला,मानाचा  पोशाख परिधान केला जातो,बगाड्याचा मान असणारे मानकरी यांच्या हस्ते विधिवत पूजा  होऊन बगाडाला प्रारंभ होतो. 

यावेळी बगाड ओढण्यासाठी मानाच्या बारा बैलाची जोडी जुंपन्यात येते. आणि बगाडास प्रारंभ होतो या भैरवनाथ बगाडे यात्रेस महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.