ऋणानुबंध जोडणारे यशवंतराव चव्हाण...
कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या काठांवर नांदणारे माझे गांव
12 March, 2025
यशवंतराव चव्हाण साहेब; महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. इतिहासाला ज्यांच्या जीवनाची दखल घ्यावी असं वाटलं, ते यशवंतराव. जनतेने त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार उगीच म्हटले नाही! आजचा प्रगत आणि सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेला महाराष्ट्र ही यशवंतरावांची देणगी आहे. त्यांनी आपले जीवन महाराष्ट्र आणि देशासाठी समर्पित केले. देवराष्ट्र सारख्या एका दुर्गम खेड्यात, गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला यशवंत, पुढे महाराष्ट्राचा नेता होतो, भारताच्या राजकारणात उतुंग काम करणारा राजकारणी आणि देशाच्या संरक्षणासाठी पाहाडासारखा उभा राहिलेला सह्याद्री म्हणून ओळखला जातो.. मृत्यूनंतर ४० वर्षांनीही त्यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण चालत नाही. सत्ताधारी पक्ष कोणताही असो, 'यशवंतराव' हा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण होऊन जातो. तो प्रत्येकाला आपला वाटतो. असे वादातीत व्यक्तिमत्व खूप विरळा असते. महाराष्ट्राच्या मातीशी जडलेलं यशवंतरावांचं ऋणानुबंधाचं नातं आणि त्याला मानवतेचा लाभलेला स्पर्श हाच याचा भावार्थ आहे. खरोखरच यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राला पडलेलं सुंदर स्वप्न आहे.
यशवंतरावांचं 'ऋणानुबंध' पुस्तकं १९७९ साली प्रसिद्ध झालं. यशवंतराव ज्या कराड गावात लहानाचे मोठे झाले, त्या कराडला त्यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे. अर्पण पत्रिकेतली त्यांची भाषा वाचून हा माणूस किती सुहृदयी होता याची साक्ष पटते. यशवंतराव लिहितात....
कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या काठांवर नांदणारे माझे गांव कऱ्हाड यास तुझ्यापासून वर्षानुवर्षे दूर राहिलो; पण तुझी ओढ नित्य वाढतच राहिली. कोयनेच्या काठी राहिलो, खेळलो; तर कृष्णेच्या काठी शिकलो, वाढलो. दोन्ही नद्यांच्या पाण्यात डुंबलो.याच पाण्याने काही छंद लावले व काही श्रद्धा दिल्या.
यशवंतराव चव्हाण साहेबांचे जीवन हे एखाद्या तपस्वी साधकासारखे आहे. बालपण अतिशय कष्टात गेलेले. घरची गरिबी होती. वडील लहानपणीच वारलेले. घरात दुसरे कोणी मिळवते नाही. सुखाने दोन घास खावेत, एवढे साधन जवळ नाही. काबाडकष्ट करून आई विठाई मुलांना वाढवत होती. मुले परावलंबी होणार नाहीत याची काळजी आईला होती. चव्हाण साहेबांचे शाळेतील जीवन याच अवस्थेत संपले. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे लहान यशवंताच्या मनात नकळत एक जिद्द निर्माण झाली. या जिद्दीतूनच पुढे महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण नावाचे तेजस्वी नेते मिळाले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सारा आसमंत भरून टाकला. ही वाटचाल सामान्य नव्हती. एका गरीब विठाईचा मुलगा स्वातंत्र्यवीर झाला. पुढे महाराष्ट्राचा पाहिला मुख्यमंत्री आणि देशाचा संरक्षण, गृह, परराष्ट्र, अर्थ या महत्वाच्या खात्यांचा मंत्री झाला. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मुत्सद्दी म्हणून नावारूपाला आला. विचारांना आचरणाचे कोंदन लाभावे तसे यशवंतरावांचे जीवन आहे. खळाळत वाहणाऱ्या शुभ्र झऱ्यासारखे आणि तिरावरल्या सृष्टीला नवसंजीवनी देणाऱ्या कृष्णा नदीच्या शांत प्रवाहासारखे त्यांचे जगणे आहे. माणसांना मानवतेचा सुगंध देणारे आणि श्रमाला प्रतिष्ठेचे तेजोवलय निर्माण करणारे यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षितिजावरचे ज्ञानसुर्य आहेत.
स्वातंत्र्य चळवळीत प्रारंभी एम. एन. रॉय यांच्या विचारसरणीने भारावलेले यशवंतराव पुढे महात्मा गांधींच्या विचाधारेपाशी स्थिरावले. साहेब स्वतः म्हणतात... "प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती गांधींच्या काँग्रेसच्या ध्येयवादात मला अधिकांशाने आढळली. नवा विचार स्वीकारून, त्या त्या घटनेचा स्वतंत्र विचाराने निर्णय करण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. माझ्या वृत्तीशी ती तंतोतंत जुळती आहे. १९४० पासूनची ती वैचारिक बैठक राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झालेली आहे." स्वातंत्र्यानंतर देशाचे सुराज्य करण्यासाठी साहेबांनी काँग्रेसचा विचार शिरोधार्य मानला. माणसांचे जीवन फुलवायचे असेल, तर त्याला सोबतीची सांगड असली पाहिजे असे ते नेहमी म्हणत. महाराष्ट्रात अशा सवंगड्यांची भली मोठी रांग त्यांनी तयार केली. त्याला बेरजेच्या राजकारणाचा मुलामा चढवत विरोधकांनाही आपलेसे करून महाराष्ट्र घडवण्यात साहेबांचे योगदान सर्वात मोठे आहे. महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर झाला, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला, महाराष्ट्राने औद्योगिक प्रगती साधली, महाराष्ट्रात हरित क्रांती आणि श्वेत क्रांती घडली, सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि तो अधिक सक्षम व प्रवाहित करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिला. ही सगळी घोडदौड एकट्या यशवंतरावांची नाही, तर त्यांनी जमवलेल्या सोबत्यांनी केलेली ती किमया आहे. साहेबांनी सहकार व शिक्षण क्षेत्राला शासकीय आधार दिला. पण त्याला सर्वदूर वाडीवस्तीवर पोहोचवण्याचे काम करणारी विचारी नेत्यांची फळी महाराष्ट्रात निर्माण झाली, म्हणून विकासाची गंगा तिथंपर्यंत पोहोचली. यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी अशी सर्वव्यापी होती. माणसांमधल्या कर्तुत्वाला उभारी देणारे यशवंतराव आता पुन्हा होणे नाही. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचे अधुरे राहिलेले स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेब पूर्ण करत होते. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' असे शिवाजी राजांना वाटत होते.. यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणाचे गुपित त्याच विचारधारेला उजाळा देणारे आहे. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' असा महाराष्ट्र यशवंतरावांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने उभारला.
राजकीय नेत्यांबरोरच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी मित्र म्हणून जमवलेली माणसं तितक्याच तोलामोलाची होती. जणू सरस्वतीच्या दरबारातील सिद्धहस्त तपस्वी! तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. स. पागे, बाळासाहेब भारदे, नरहर कुरुंदकर, ग. दि. मांडगुळकर, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, पू. ल. देशपांडे अशी शेकडो नावं सांगता येतील. सगळे साहेबांचे मित्र, सहकारी होते. त्याचवेळी नव्या युगाचे आव्हान पेलणारे पण कोणतीही पार्श्वभूमी नसलेले बलुतंकार दया पवार असोत, निसर्गकवी ना. धो. महानोर असोत, भटक्याकार लक्ष्मण जाधव असोत, शेतकरी कवी इंद्रजित भालेराव असो वा नारायण सुर्वे असोत.. इथंही अनेक नावं घेता येतील. त्यांना हुडकून प्रतिष्ठा देणारे यशवंतराव चव्हाणच होते.
आज १२ मार्च म्हणजे साहेबांचा जन्म दिवस.. त्यांच्या आठवणींचे स्मरण करताना काय काय लिहावे, किती लिहावे असे वाटत राहते. विविध क्षेत्रात आणि विविध स्तरावर साहेबांनी केलेलं अफाट काम नजरेसमोर उभे राहते. दिल्ली असो, मुंबई असो अथवा आपलं गांव.. साहेबांचा स्पर्श झाला नाही असे एकही काम नाही. त्यांचा जन्म हा आपला भाग्योदय होता असं मानणारा मी त्यांचा चाहता आहे... भारताच्या मातीशी व मानवतेशी ऋणानुबंध जोडणारे ते एकलव्य होते. साहेबांना विनम्र अभिवादन !!
-राजेंद्र शेलार सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी