पर्यटनविषयक सुविधा विकसित करणार-ना.शंभूराज देसाई
कोयना परिसर पर्यटनाचे हब होणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
28 February, 2025
मुंबई, दि. २८ : सातारा जिल्ह्यातील कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोयना धरण आणि जलाशय परिसर हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, येथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटन विषयक कामांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील, अधिक्षक अभियंता बोरसे तर दूरदृश्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील उपस्थित होते.
कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्य स्थिती मंत्री देसाई यांनी बैठकीत जाणून घेऊन ते म्हणाले , या ठिकाणी पाच व्ही.व्हीआयपी, पाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच या रिसॉर्टच्या जागे संदर्भात काही प्रश्न असतील ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर सोडविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोयनानगर येथील नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पातील कामांमधील अडीअडचणींचा आढावाही मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.