single-post

जळगाव विकास सोसायटीवर राष्ट्रवादी-शिवसेना युतीची सत्ता , १३ पैकी १३

१३ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय; कोरेगाव तालुक्यात नव्या राजकीययुगाची सुरुवात , राजकीय समीकरणाची चर्चा

11 May, 2026

कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जळगाव येथील भगवानराव जाधव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीने दणदणीत विजय मिळवत सर्व १३ जागांवर कब्जा केला. युतीच्या पॅनेलने भाजपप्रणित विरोधी पॅनेलचा दोनशेहून अधिक मतांनी पराभव करत सोसायटीवरील आपले वर्चस्व कायम राखले. या निकालानंतर कोरेगाव तालुक्यात नव्या युगाची व राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असून आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी-शिवसेना पॅटर्न’ प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळख असलेले भगवानराव जाधव यांचे या सोसायटीवर पूर्वीपासून प्रभुत्व होते. सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर त्यांनी सोसायटी सक्षम केली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

निवडणूक जाहीर होताच ना. मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, दयानंद भोसले तसेच कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्ते एकत्र आले. राष्ट्रवादीचे युवा नेते गौरव जाधव आणि शिवसेनेचे युवराज पाटील यांच्या पुढाकारातून संयुक्त पॅनेल उभे करण्यात आले होते.

यांच्या विरोधात आ. महेश शिंदे समर्थक व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. कर्णवर यांच्या उपस्थितीत शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी-शिवसेना युतीच्या पॅनेलने एकहाती विजय मिळवला.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : अभिजित जाधव, गौरव जाधव, दत्तात्रय जाधव, अमोल भोसले, दत्तात्रय विठोबा जाधव, स्वप्निल जाधव, ईश्वर पानबुडे, हणमंतराव माने, रूक्मिणी वाघ, वनिता जाधव, मनोज माने, विष्णू शिडतुरे आणि विठ्ठल पवार.

पॅनेलच्या विजयासाठी माजी सरपंच राजेंद्र जाधव, सुरेश जाधव, संजय जाधव, अरुण जाधव, शिवाजी जाधव, हणमंत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.