single-post

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत कै. लक्ष्मणराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

स्व.लक्ष्मणतात्या पाटील यांची ८७ वी जयंती

25 February, 2025

 दि.२५(प्रतिनिधी) सातारा जिल्ह्याचा पोलादी पुरुष  जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत, जिल्ह्यातील गोरगरिबांचा आधारवड, कार्यकर्त्यांच्या गराडयातील नेता अशी  ओळख असणारे, सामाजिक, राजकारण, शिक्षण  सहकार क्षेत्रातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची ८७ व्या जयंती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय उत्साहात साजरी करण्यात आली.

   यावेळी बँकेचे उपाध्यक्ष  अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते,  सुनील खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे,  प्रवीण भिलारे विविध विभागांचे उपव्यवस्थापक आदी मान्यवर यांनी  स्व.खा. लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले वाहून विनम्र अभिवादन केले.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले सातारा जिल्हा बँकेच्या एकूणच वाटचालीत लक्ष्मणराव तात्या यांचे भरीव असे योगदान आहे. तात्यांनी बँकेच्या प्रशासकीय शिस्तीला प्रथम प्राधान्य दिलेले होते. स्व.लक्ष्मणराव पाटील निर्भय व निस्वार्थी वृत्तीचे होते. राजकीय वारसा नसलेले सातारा जिल्ह्यातील हे नेतृत्व ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून यशाची शिखरे गाठत दोनदा खासदार झाले. गरजूंना शक्य ती मदत मनापासून करण्याच्या वृत्तीमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. सर्व सामान्य जनता हिच तात्याची मोठी ताकद होती,  जिल्ह्यातील राजकारणात तात्याचा दबदबा मोठा होता, म्हणून महाराष्ट्राचे लक्ष सातारा जिल्ह्याकडे नेहमी असायचे, तात्यांचे संघटन कौशल्य मजबूत होते म्हणूनच तात्याचा जिल्हाचा राजकारणात होल्ड होता, सर्वसामान्यांचा आधारवड अशी त्यांची ख्याती होती.

या प्रसंगी राजेंद्र राजपुरे म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला  मार्गदर्शक ऊर्जा देणारे आहे. बोपेगावचे सरपंच ते लोकसभा सदस्य, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशी       स्व. लक्ष्मणराव पाटील यांची यशस्वी पन्नास वर्षाची कारकीर्द आहे.या प्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर.डी. पाटील, आबासाहेब वीर, बाळासाहेब देसाई इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभल्यामुळे आशिया खंडात आज बँकेच्या नावाचा लौकिक आहे, बँकेची उत्तम प्रगती झालेली आहे. स्व.लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात वेगळा ठसा उमटविला. बँकेच्या प्रगतीमध्ये लक्ष्मण तात्याचे महत्त्वाचे योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे.तात्याचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने बँकेत आर्थिक शिस्त, राजकारण विरहीत कामकाज आज आपणांस दिसून येत आहे यावेळी बँकेचे संचालक तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी कर्मचारी  वर्ग बहुसंख्याने उपस्थित होता.