single-post

अखर्चित निधीचा जाब विचारल्यानेच ‘माईक’ खेचला; अनिल देसाईंचा सनसनाटी आरोप

​लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी; विभागीय आयुक्तांकडे तक्रार ​दहिवडी / प्रतिनिधी :

07 May, 2026

दहिवडी / जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही व्यवस्था पुनर्संचयित झाली असतानाही, काही अधिकारी अद्याप एकाधिकारी पद्धतीने वागत आहेत. दहिवडी येथील बैठकीत दुष्काळी भागातील विकासकामांच्या अखर्चित निधीबाबत जाब विचारला असता, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) माझ्या हातातील माईक खेचून घेतला. हा प्रकार म्हणजे लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी आहे, असा घणाघाती आरोप सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला.

​सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रकरणी पुणे विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, दाद न मिळाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला.

​अधिकारी अहंकारी; २५ वर्षांत असा अनुभव नाही

​देसाई म्हणाले की, "माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक वरिष्ठ अधिकारी पाहिले, मात्र इतकी अहंकारी वृत्ती कधीही अनुभवली नाही. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित असते. मात्र, विकासकामांच्या अडचणी मांडल्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकशाही मूल्यांचा अपमान केला आहे."

​विकासकामांत १०० कोटींची अनियमितता?

​माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांमधील सुमारे १०० कोटी रुपयांच्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा देसाई यांनी केला. "अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळून दीड वर्ष झाले तरी कामे सुरू झालेली नाहीत. ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी प्रशासन जाणीवपूर्वक विलंब लावत आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, हा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले.

​जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावरून टीकेची तोफ

​जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाबाबत बोलताना देसाई यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. "पूर्वी सौंदर्यपूर्ण असलेल्या या बंगल्याची मागील चार वर्षांत दुरवस्था करून त्याचे 'भूत बंगला' करण्यात आले. आता पुन्हा त्याच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आणि भ्रष्टाचार आहे," अशी टीका त्यांनी केली.

​शिवरी येथील घटनेचा निषेध

​माण तालुक्यातील शिवरी येथे बुद्ध पौर्णिमेच्या काळात बुद्ध मंदिर पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही देसाई यांनी यावेळी केला. या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.

​"लोकशाहीत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आम्हाला निवडून दिले जाते. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. विकासकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनताच जाब विचारेल."

— अनिल देसाई (उपाध्यक्ष, सातारा जिल्हा बँक)