डी. पी. भोसले महाविद्यालयात सिंथेटिक ट्रॅक उभारावा; माजी विद्यार्थ्यांचे शरद पवारांना साकडे-सुनील खत्री
कोरेगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील खेळाडूंना सुसज्ज मैदानाचा लाभ मिळण्याची अपेक्षा
09 May, 2026
कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
रयत शिक्षण संस्थेच्या येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'सिंथेटिक ट्रॅक' उभारण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालयाच्या 'एक्स डीपीयन्स' तथा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांना शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.
या शिष्टमंडळात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, महाविद्यालयाचे माजी विद्यापीठ प्रतिनिधी तथा माजी जनरल सेक्रेटरी पांडुरंग बर्गे, प्राचार्य अरुण बर्गे, चंद्रकांत बर्गे, विजयकुमार घार्गे आणि दीपक देवरे यांचा समावेश होता.
मैदानाने घडवले आंतरराष्ट्रीय खेळाडू
खा. पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१४-१५ मध्ये महाविद्यालयाच्या मैदानावर ४०० मीटरचा सहा लेनचा मातीचा ट्रॅक तयार करण्यात आला होता. या सुविधांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळाले. गेल्या काही वर्षांत येथील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धांमध्ये २, राष्ट्रीय स्तरावर ६० ते ६५ आणि राज्य स्तरावर तब्बल ८० पदके पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या घवघवीत यशामुळे शिवाजी विद्यापीठानेही महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे विशेष कौतुक केले आहे.
सिंथेटिक ट्रॅकची गरज का?
सध्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धा या 'सिंथेटिक ट्रॅक'वर आयोजित केल्या जातात. डी. पी. भोसले महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या मातीच्या ट्रॅकवर सराव करतात. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेवेळी त्यांना सिंथेटिक ट्रॅकवर धावताना अडचणी येतात, ज्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. ही तफावत दूर करण्यासाठी आणि खेळाडूंना आधुनिक तंत्रज्ञानाचा सराव मिळावा, यासाठी येथे सिंथेटिक ट्रॅक होणे काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
७०० हून अधिक विद्यार्थी सैन्यात व पोलीस दलात
या मैदानाचा उपयोग केवळ खेळाडूंपुरता मर्यादित राहिलेला नाही. २०१४ पासून आजपर्यंत कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील ७०० ते ८०० तरुण-तरुणी या मैदानावर सराव करून भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि पोलीस दलात भरती झाले आहेत. शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी हे मैदान करिअर घडवणारे केंद्र ठरले आहे.
शासकीय निधीतून पाठपुराव्याची मागणी
भव्य मैदान उपलब्ध असल्यामुळे कोरेगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यांतूनही विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने किंवा केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा निधीतून या मैदानावर सिंथेटिक ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही विनंती माजी विद्यार्थ्यांनी खा. शरद पवार यांच्याकडे केली आहे. पवारांनीही या मागणीची दखल घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!