कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल ९५.४७ टक्के; मुलींनी पुन्हा मारली बाजी
राज्यात विभागाचा दुसरा क्रमांक कायम; कॉपीमुक्त अभियानाचा सकारात्मक परिणाम
08 May, 2026
कोल्हापूर | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाचा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) जाहीर झाला. यंदा विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.४० टक्क्यांनी घट झाली आहे. तरीही राज्यातील विभागीय मंडळांमध्ये कोल्हापूर विभागाने दुसरा क्रमांक कायम राखला आहे.
कोल्हापूर विभागात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ४७६ माध्यमिक शाळांमधून १ लाख २९ हजार ४९९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २९ हजार ६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, तर १ लाख २३ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय निकाल
कोल्हापूर जिल्हा : ९६.६७ टक्के
सातारा जिल्हा : ९५.७१ टक्के
सांगली जिल्हा : ९३.५६ टक्के
कोल्हापूर जिल्ह्याने विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून सांगली जिल्ह्याचा निकाल तुलनेने कमी राहिला.
मुलींची सरशी कायम
यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली. विभागातील मुलांचा निकाल ९३.८६ टक्के लागला, तर मुलींचा निकाल ९७.३६ टक्के इतका राहिला. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ३.०५ टक्क्यांनी अधिक आहे.
कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम
यंदाच्या परीक्षेत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सक्तीची करण्यात आली होती. तसेच भरारी पथके, दक्षता समित्या आणि झूम अॅपद्वारे देखरेख यामुळे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. परीक्षा काळात प्रत्यक्ष केंद्रांवर एकाही गैरप्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती मंडळाने दिली.
परीक्षोत्तर चौकशीत चार विद्यार्थी गैरमार्ग प्रकरणात दोषी आढळले असून संबंधित विषयांचे गुण रद्द करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी मंडळाने समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली होती. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन असे सहा अनुभवी समुपदेशक नियुक्त करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी यूट्यूबवर विषयनिहाय व्हिडिओ मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती.
गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांतील क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याबरोबरच उत्तरपत्रिका कशी लिहावी, वेळेचे नियोजन कसे करावे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
परीक्षा केंद्रांची माहिती
कोल्हापूर विभागात एकूण ३६२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यात ११६, सांगलीत १०५ आणि कोल्हापूरमध्ये १४१ परीक्षा केंद्रांचा समावेश होता.
निकालातील घट का?
मंडळाच्या माहितीनुसार, यंदा कॉपीमुक्त अभियान अधिक कठोरपणे राबविण्यात आल्याने निकालात १.४० टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, हा निकाल वस्तुस्थितीदर्शक आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा मंडळाने केला आहे.
राज्याच्या तुलनेत सरस कामगिरी
राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के असताना कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्याच्या सरासरीपेक्षा कोल्हापूर विभागाचा निकाल ३.३८ टक्क्यांनी अधिक राहिला आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!