यंदा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के
कोकण विभाग राज्यात अव्वल; मुलींनी पुन्हा मारली बाजी
08 May, 2026
पुणे | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.०१ टक्क्यांची घट झाली आहे. कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के लागला आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून १५ लाख ५५ हजार २६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के, तर मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक राहिली.
विभागनिहाय निकाल
कोकण – ९७.६२ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
पुणे – ९४.२४ टक्के
नाशिक – ९०.५३ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नागपूर – ८९.०७ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
पुणे – ९४.२४ टक्के
नाशिक – ९०.५३ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नागपूर – ८९.०७ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ टक्के
राज्यातील २३ हजार ६९८ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६ हजार ६१२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच ६४ विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती मंडळाने दिली.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवली आहे. तर ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ लाख ८० हजार ४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १ लाख ३४ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
यंदा विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रमुख विषयांच्या परीक्षांमध्ये एका दिवसाचा अवधी ठेवण्यात आला होता. परीक्षेदरम्यान राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था करण्यात आली होती.
निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सुविधा कायम ठेवण्यात आली असून, ४१ हजारांहून अधिक विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!