single-post

​डॉ. संजय कुंभार यांना ‘आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर

​भारतीय हिंदू महासंघाकडून गौरव; ५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्हाने होणार सन्मान

04 May, 2026

​सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:

सातारा जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी आरोग्य क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारतीय हिंदू महासंघाच्या वतीने त्यांना मानाचा ‘आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

​‘उंब्रज पॅटर्न’ची राज्यस्तरावर दखल

​डॉ. संजय कुंभार यांनी विशेषतः कोरोना महामारीच्या काळात राबवलेला ‘उंब्रज पॅटर्न’ संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८३ टक्क्यांवर पोहोचले, तर मृत्यूचे प्रमाण केवळ ०.८४ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात यश आले. पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधून त्यांनी उभारलेली आरोग्य साखळी अत्यंत प्रभावी ठरली.

​विविध पुरस्कारांनी सन्मानित

​डॉ. कुंभार यांच्या कार्यतत्परतेची दखल यापूर्वीही अनेक स्तरांवर घेण्यात आली आहे. नुकतेच कराड तालुक्यातील काले येथे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते त्यांना ‘आदर्श डॉक्टर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. कुंभार यांनी केवळ एक शासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

​आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा

​सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेश बोतालजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कुंभार यांनी प्रतिकूल परिस्थितीत बजावलेल्या रुग्णसेवेची वस्तुनिष्ठ दखल भारतीय हिंदू महासंघाने घेतली आहे.  डॉ. कुंभार यांचे कार्य अत्यंत पारदर्शक आणि जनहिताचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

​जून च्या आठवड्यात होणार सोहळा

​डॉ. कुंभार यांचा हा उचित गौरव करण्यासाठी जून च्या दुसऱ्या आठवड्यात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात राज्याच्या कॅबिनेट मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना ‘आरोग्य रत्न’ पुरस्कार प्रदान केला जाईल. या पुरस्कारामुळे आरोग्य विभागात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. डॉ. कुंभार यांच्या या यशाबद्दल जिल्हा आरोग्य यंत्रणेतून आणि सामाजिक स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.