single-post

शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपिअरपर्यंतचा थक्क करणारा प्रवास: आदरणीय चंद्रकांत यादव सरांची सेवापूर्ती

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरले इंग्रजीचे 'भीष्म पितामह' ​(दहावीचा १००% निकाल आणि बोर्डाचे चीफ मॉडरेटर म्हणून त्यांच्या शैक्षणिक योगदानासाठी) ​; रयतचा 'वसा' अन् कर्मवीरांचा 'वारसा' जपलेला शिक्षक

29 April, 2026

शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपिअरपर्यंतचा थक्क करणारा प्रवास: आदरणीय चंद्रकांत यादव सरांची सेवापूर्ती

​लेखक: प्रा. सम्यक शक्यरत्न

​माणसाचे कर्तृत्व हे त्याच्या परिस्थितीवर नाही, तर त्याच्या जिद्दीवर अवलंबून असते, याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे रयत शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ शिक्षक आणि इंग्रजी विषयाचे चीफ मॉडरेटर आदरणीय चंद्रकांत यशवंत यादव सर. ३० मे २०२६ रोजी, तब्बल ३४ वर्षे आणि १० महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर, यादव सर ज्ञानाच्या या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ एका शिक्षकाचा प्रवास नसून, तो एका संघर्षाचा आणि यशाचा महाकाव्यच आहे.

​संघर्षातून फुललेले व्यक्तिमत्व

​१ जून १९६८ रोजी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे मलवडी या दुष्काळी गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात सरांचा जन्म झाला. ज्या समाजात अज्ञान, दैववाद, व्यसनाधीनता आणि ‘शिव्यांच्या ओव्या’ गायल्या जायच्या, अशा वातावरणात सरांचे बालपण गेले. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नव्हता. मात्र, आई-आप्पा आणि बंधू सत्यवान यादव यांनी काबाडकष्ट करून सरांच्या शिक्षणाची वाट मोकळी केली. स्वतः सर सुट्टीच्या दिवशी गावी वाक बनवण्याचे काम करत आणि आई-वडिलांना शेतात मदत करत. हीच कष्टाची शिदोरी त्यांना पुढे यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेली.

​इंग्रजी भाषेवर प्रभुत्व: एक वेगळी वाट

​ज्या ग्रामीण भागात इंग्रजीची भीती वाटते, तिथे सरांनी याच जागतिक भाषेला आपले शस्त्र बनवले. रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजमधून उच्च शिक्षण आणि आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथून बी.एड. पूर्ण केले. त्यांच्या या 'शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपिअरपर्यंतच्या' प्रवासाने अनेकांना थक्क केले. ५ ऑगस्ट १९९१ रोजी वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी 'नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, येळगाव' येथे आपल्या शिक्षक पेशाची सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्या दारिद्र्याचा पडदा फाटायला सुरुवात झाली.

​अध्यापन कौशल्य आणि पुरस्कार

​सरांनी आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत साखरपा (रत्नागिरी), मलवडी, पसरणी, सुरवडी आणि वावरहिरे अशा विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. विशेषतः न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी येथे त्यांनी प्रदीर्घ १९ वर्षे सेवा दिली. इंग्रजी विषयाचे चीफ मॉडरेटर म्हणून काम करताना त्यांनी सलग ५ वर्षे इयत्ता १० वीचा निकाल १००% लावून एक विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या योगदानाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

​साने गुरुजींचा वारसा जपणारे 'काळीज'

​आजच्या व्यावसायिक युगात जिथे शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, तिथे यादव सर मात्र साने गुरुजींच्या माणुसकीच्या नात्याने शिकवत राहिले. "Something is better than अजिबात nothing" असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती घालवली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून दप्तर आणि गणवेश घेऊन देणे, ही त्यांच्यातील 'कर्मवीर अण्णांच्या' संस्कारांची पावती आहे. शाळेतील सहकारी इंगळे सर आणि केंद्रप्रमुख महेंद्र हजारे सर म्हणतात त्याप्रमाणे, "या माणसाला एकही शत्रू असणार नाही," हे त्यांच्या निगर्वी स्वभावाचे प्रतीक आहे.

​बहुआयामी व्यक्तिमत्व

​शिक्षक असण्यासोबतच सर एक उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू देखील आहेत. त्यांचे मित्र चंद्रकांत जाधव सरांच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक करतात. सरांचे संघटनात्मक कौशल्य, नम्रता, निर्व्यसनी वृत्ती आणि 'माणसे जोडण्याची कला' यामुळे ते सर्वत्र प्रिय झाले. त्यांच्या पत्नीने म्हटल्याप्रमाणे, "सरांचे पहिले प्रेम म्हणजे त्यांची शाळा," यातूनच त्यांचे त्यांच्या पेशाप्रती असलेले समर्पण दिसून येते.

​शुभेच्छा आणि कृतज्ञता

​सरांचा सेवापूर्ती सोहळा म्हणजे जणू अल्फोन्स डोडेट यांच्या 'द लास्ट लेसन' (The Last Lesson) मधील एम. हॅमेल यांच्या निरोपाच्या प्रसंगासारखाच भावूक होता. दूरवरून आलेले मित्र, नातेवाईक, अधिकारी आणि विद्यार्थी हे सर्व सरांच्या कामाप्रती असलेल्या कृतज्ञतेपोटी जमले होते.

​आदरणीय यादव सर, फळा आणि खडूशी असलेले तुमचे नाते आता थोडे विरळ होईल, परंतु तुम्ही घडवलेल्या पिढ्या आणि दिलेला इंग्रजी भाषेचा संस्कार पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. केवळ 'पॉझिटिव्ह थिंकिंग' (Positive Thinking) चा मंत्र घेऊन जगणाऱ्या आपणास पुढील आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

​तुमचा संघर्षमय प्रवास हाच भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.