single-post

शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपियरपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; चंद्रकांत यादव सरांची सेवापूर्ती

दारिद्र्याच्या कुशीतून ज्ञानाच्या शिखरावर झेप ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लावणारा समर्पित शिक्षक सलग पाच वर्षे दहावी इंग्रजीचा शंभर टक्के निकाल ‘समथिंग इज बेटर दॅन नथिंग’चा आत्मविश्वास देणारा गुरू विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या खिशातून मदतीचा हात

29 April, 2026


शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपियरपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; चंद्रकांत यादव सरांची सेवापूर्ती

सातारा दि.२९ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा ) : दारिद्र्य, अज्ञान आणि प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतून मार्ग काढत इंग्रजीसारख्या जागतिक भाषेत प्रभुत्व मिळवणारे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे आदरणीय चंद्रकांत यशवंत यादव सर ३० मे २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत. तब्बल ३४ वर्षे १० महिन्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवले.

माण तालुक्यातील वरकुटे मलवडी या दुष्काळग्रस्त गावात १ जून १९६२ रोजी जन्मलेल्या यादव सरांचा प्रवास अत्यंत खडतर होता. शिव्यांच्या ओव्यांचा सांस्कृतिक प्रभाव असलेल्या वातावरणातून शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत त्यांनी ज्ञानाच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडील आणि बंधूंनी केलेल्या कष्टांची जाणीव ठेवत त्यांनी शिक्षणात सातत्य राखले.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर आजाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथून बी.एड. पूर्ण करून त्यांनी इंग्रजी विषयात विशेष प्रावीण्य मिळवले. घरात कोणताही शैक्षणिक वारसा नसताना इंग्रजीसारखा विषय निवडून त्यात प्रभुत्व मिळवणे हा त्यांच्या जिद्दीचा पुरावा ठरला.

१९९१ साली अवघ्या २३व्या वर्षी नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, येळगाव (ता. कराड) येथे सहशिक्षक म्हणून त्यांनी कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय, साखरपा (जि. रत्नागिरी), त्रिंबकराव काळे विद्यालय, मलवडी, श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी आणि न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी येथे त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. विशेषतः सुरवडी येथे १९ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी इंग्रजी विषयात उल्लेखनीय यश संपादन केले. शेवटच्या टप्प्यात श्री पाणलिंग विद्यालय, वावरहिरे येथे तीन वर्षे सेवा देऊन ते निवृत्त होत आहेत.

यादव सरांनी केवळ अध्यापनच केले नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कामही केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती वाटू नये म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती वापरल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाच वर्षे दहावीच्या इंग्रजी विषयाचा शंभर टक्के निकाल लागला, ही त्यांच्या कार्याची मोठी पावती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना स्वतःच्या खर्चातून दप्तर, गणवेश देणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. ‘समथिंग इज बेटर दॅन नथिंग’ असे म्हणत ते विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करत. शिस्तप्रिय, नम्र, प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, सहकारी आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. “या माणसाला एकही शत्रू नसावा,” असे गौरवोद्गार केंद्रप्रमुख महेंद्र हजारे यांनी काढले. तर “परिस्थितीतून झगडून तयार झालेलं हे व्यक्तिमत्त्व आहे,” असे प्रा. वसंतराव यादव यांनी नमूद केले.

सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा भावनिक वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र, नातेवाईक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत यादव सरांच्या कार्याचा गौरव केला.

“शिव्यांच्या ओव्यांपासून शेक्सपियरपर्यंतचा प्रवास” ही केवळ उपमा नसून, ती एका जिद्दी, संघर्षशील आणि समर्पित शिक्षकाची जीवनगाथा आहे. त्यांच्या कार्यामुळे घडलेल्या पिढ्या आणि त्यांनी दिलेले संस्कार यामुळे त्यांचे कार्य पुढील काळातही प्रेरणादायी ठरणार आहे.

सेवापूर्तीच्या निमित्ताने यादव सरांना उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.