single-post

१०८ सेवा शाप की वरदान?” – सातारा न्यायालयासमोर रुग्णाला वेळेत मदत न मिळाल्याने संताप

१०८ सेवेचा प्रतिसाद उशिरा; रुग्णाची प्रकृती गंभीर न्यायालयाच्या गेटवरच मदतीसाठी धावपळ, नागरिकांचा संताप वकिलांचा आर्त फोन; तरीही ॲम्बुलन्स वेळेत न पोहोचल्याचा आरोप शेवटी खासगी कारमधून रुग्णाला रुग्णालयात हलविण्याची वेळ

30 April, 2026

सातारा : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा: आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेली 108 Emergency Response Service ही सेवा खरोखरच जनतेसाठी वरदान आहे का, असा गंभीर प्रश्न साताऱ्यातील घटनेनंतर उपस्थित होत आहे.

आज सातारा जिल्हा सत्र न्यायालय येथे एका सामाजिक आंदोलनाच्या तारखेसाठी आलेल्या नागरिकांसमोर अचानक एक व्यक्ती बेशुद्ध होऊन पडल्याची घटना घडली. उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्या व्यक्तीला न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झोपवून प्राथमिक मदत देण्याचा प्रयत्न केला. काहीजण पाय चोळत होते, तर काहीजण छातीवर दाब देत होते. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याच वेळी न्यायालयातील एका जागरूक वकिलांनी तातडीने १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तब्बल दहा मिनिटे फोनवरून सातत्याने विनंती करूनही प्रतिसाद समाधानकारक मिळाला नाही. “सातारा कोर्टाच्या गेटवर या, रुग्ण गंभीर आहे, श्वासोच्छ्वास नीट चालू नाही,” असे वारंवार सांगूनही संबंधित कर्मचाऱ्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला.

दरम्यान, रुग्णाची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे पाहून अखेर तेथील एका नागरिकाने स्वतःची कार पुढे केली. काही जणांच्या मदतीने त्या व्यक्तीला कारमध्ये घालून तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या संपूर्ण घटनेदरम्यान १०८ सेवेकडून कोणतीही मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली.

या घटनेबाबत उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रमेश अनिल उबाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर त्या व्यक्तीचा जीव गेला असेल, तर यासाठी १०८ सेवेकडील निष्काळजीपणा जबाबदार धरला पाहिजे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

न्यायालयासारख्या ठिकाणीच एखाद्या नागरिकाला वेळेत मदत न मिळाल्याची घटना धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. “न्यायदेवतेच्या दारातच अन्याय झाला,” अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे १०८ आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.