कोरेगाव शहराची नगर परिषदेकडे 'शंभर टक्के' वाटचाल; लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज
प्रशासकीय हालचालींना वेग; वाढत्या नागरीकरणामुळे शहराच्या विकासाला मिळणार नवे ताकद
26 April, 2026
कोरेगाव शहराची नगर परिषदेकडे 'शंभर टक्के' वाटचाल; लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज
प्रशासकीय हालचालींना वेग; वाढत्या नागरीकरणामुळे शहराच्या विकासाला मिळणार नवे ताकद
कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा
कोरेगाव शहराच्या नागरी विकासाचा वेग प्रचंड वाढला असून, वाढत्या लोकसंख्येच्या निकषानुसार आता नगरपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होण्याची प्रक्रिया जवळपास निश्चित मानली जात आहे. सध्याच्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे गेली असून, नगर परिषदेसाठी आवश्यक असलेला २५ हजारांचा लोकसंख्येचा निकष कोरेगावने केव्हाच पुढे केला आहे. त्यामुळे कोरेगाव आता 'क' वर्ग नगर परिषदेच्या उंबरठ्यावर उभे आहे. नगरपंचायत चे नगर परिषदेमध्ये केव्हाही रूपांतर होऊ शकते.
लोकसंख्येचा टप्पा ओलांडला
सन २०११ च्या जनगणनेनुसार कोरेगाव शहराची लोकसंख्या २४ हजार ७०० इतकी होती. मात्र, गेल्या दशकात शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. औद्योगिक वाढ, विस्तारलेली व्यापारी पेठ आणि निवासी क्षेत्रातील क्रांती यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. सध्या सुरू असलेल्या नवीन लोकसंख्या मोजणीत हा वाढीव आकडा स्पष्ट होणार असून, तो ४० हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार २५ हजारांहून अधिक लोकसंख्या असल्यास तिथे नगर परिषद स्थापन करता येते. कोरेगाव शहरात ची लवकरच जनगणना सुरू होणार आहे.
विकासाची मोठी झेप
नगर परिषद स्थापन झाल्यास कोरेगाव शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने नवे बळ मिळणार आहे. नगर परिषदेमुळे अधिक शासकीय निधी उपलब्ध होईल. परिणामी, नियोजनबद्ध पायाभूत सुविधा, सुधारित पाणीपुरवठा योजना, आधुनिक स्वच्छता व्यवस्था, दर्जेदार रस्ते, आरोग्य सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदलांसाठी मोठी तरतूद शक्य होईल.
ऐतिहासिक वारसा अन 'स्मार्ट' ओळख
कोरेगाव शहराला मोठा ऐतिहासिक आणि व्यापारी वारसा लाभला आहे. एकेकाळी रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन, 'कोरेगावचा घेवडा' याला मिळालेले पेटंट आणि सातारा जिल्ह्यातील कापडाची प्रमुख व्यापारी पेठ म्हणून शहराचा नावलौकिक आहे. आज कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराची वाटचाल 'स्मार्ट सिटी'कडे सुरू आहे.
नेतृत्वाची दूरदृष्टी आणि प्रशासकीय वचक
आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात विकासकामांचा धडाका सुरू आहे. विशेषतः नगरपंचायतीचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष राहुल बर्गे , सर्व नगरसेवक यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रशासनावरील वचकामुळे शहराचा कायापालट होत आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत झालेली प्रगती यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राहुल बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शहराची ही वाटचाल अधिक गतिमान झाली असून, नगर परिषद झाल्यानंतर विकासाचा हा रथ अधिक वेगाने धावेल, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.
नागरिकांकडून स्वागत
नगर परिषद होण्याच्या हालचालींचे स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नगर परिषद होणे काळाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासनाने यासंदर्भातील पुढील तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी कोरेगाववासियांतून होत आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!