NCERT विरोधात साताऱ्यात रणशिंग; छत्रपती घराण्याच्या नेतृत्वात भव्य 'आक्रोश मोर्चा'
इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही! साताऱ्यात जनक्षोभ; भगव्या वादळाचा इशारा. मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने संताप. NCERT च्या 'त्या' निर्णयाविरोधात सातारकर रस्त्यावर.
24 April, 2026
NCERT विरोधात साताऱ्यात रणशिंग; छत्रपती घराण्याच्या नेतृत्वात भव्य 'आक्रोश मोर्चा'
सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
NCERT च्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आणि साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात 'एल्गार' पुकारण्यात आला. छत्रपती घराण्याच्या वंशज श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वात साताऱ्यात भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारच्या या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. "मराठा इतिहासाचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो", अशा घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले होते.
इतिहास पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही!
सकाळपासूनच सातारा शहरात आंदोलनाचे वातावरण होते. छत्रपती घराण्याने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत विविध सामाजिक संघटना, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने राजवाडा परिसरात जमा झाले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत NCERT च्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे फडकवून देशाचे रक्षण केले, तोच देदिप्यमान इतिहास आणि नकाशा पुस्तकातून हटवणे ही बाब अक्षम्य असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
प्रशासनाला दिला निर्वाणीचा इशारा
मोर्चाच्या समारोपप्रसंगी छत्रपती घराण्याच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. "मराठा साम्राज्य हा केवळ महाराष्ट्राचा नाही, तर देशाच्या अस्मितेचा विषय आहे. अभ्यासक्रमातून नकाशा हटवून इतिहास पुसण्याचे कारस्थान तात्काळ थांबवावे. हा निर्णय मागे न घेतल्यास हे आंदोलन केवळ साताऱ्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर तीव्र केले जाईल," असा इशारा यावेळी देण्यात आला.
शहरात कडक पोलीस बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि चौकांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने चोख खबरदारी घेतल्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला. मात्र, या प्रकरणावरून आता इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये संतापाची लाट असून, याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!