सातारा पालिकेसमोर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान; १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरणाची शक्यता
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात विराजमान; शहराच्या वैभवात पडली भर. ऐतिहासिक क्षण: १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरणाची जोरदार तयारी
28 April, 2026
सातारा पालिकेसमोर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान; १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरणाची शक्यता
सातारा जरंडेश्वर समाचार वृत्तसेवा :
क्रांतिकारी लेखक आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सातारा नगर परिषदेच्या प्रांगणात उभारण्याचे सातारकरांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. मुंबईहून आणलेला हा भव्य पुतळा नियोजित स्थळी बसवण्यात आला असून, आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या ऐतिहासिक स्मारकाच्या अनावरण सोहळ्याची.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सोहळ्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी 'महाराष्ट्र दिन' आणि 'जागतिक कामगार दिन' यांचे औचित्य साधून या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होण्याची दाट शक्यता असून, प्रशासकीय स्तरावर त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. अण्णाभाऊंनी आयुष्यभर कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून लढा दिला, त्यामुळे कामगार दिनी होणारा हा सोहळा सातारच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल.
पाठपुरावा आणि प्रशासकीय साथ
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी, सागर भिसे सचिन वायदंडे, बाबरसर,यांनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली होती. या प्रक्रियेत मुख्याधिकारी बापट यांनी सकारात्मक भूमिका घेत पूर्ण सहकार्य केले. विशेषतः, सामाजिक कार्यकर्ते किशोर गालफाडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण १०० टक्के योगदानामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहत आहे.
संघर्षाची पार्श्वभूमी आणि पेढे वाटून आनंदोत्सव
यापूर्वी माजी नगरसेवक अमर गायकवाड यांनी पालिकेसमोर अण्णाभाऊंचा अर्धपुतळा उभारला होता. मात्र, त्या काळी त्यांना मोठ्या राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागले होते. आज त्याच जागी दिमाखात पूर्णाकृती पुतळा उभा राहिल्याने बहुजन समाज आणि साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुतळाला मंजुरी आणि निधी ची तरतूद झाल्यानंतर शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. तत्कालीन नगराध्यक्षा माधवी कदम व सर्व नगरसेवकांनी या पुतळ्याला मंजुरी देऊन या कार्याला बळ दिले होते.
सातारच्या वैभवात भर घालणारा हा पूर्णाकृती पुतळा आता लोकशाहीरांच्या विचारांची प्रेरणा देत पालिकेसमोर उभा आहे. आता केवळ औपचारिक अनावरणाची प्रतीक्षा उरली असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सातारकर उत्सुक आहेत.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!