single-post

कोरेगाव नगरपंचायत २०२७: नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची 'फिल्डिंग'; कोरेगावचे राजकीय रणांगण तापले!

​विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यास अवधी; मात्र आतापासूनच 'गल्ली ते दिल्ली' हालचालींना वेग | 'वेल क्वालिफाईड' चेहऱ्यासाठी मतदारांचा कौल?

28 April, 2026

कोरेगाव नगरपंचायत २०२७: नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची 'फिल्डिंग'; कोरेगावचे राजकीय रणांगण तापले!

​विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपण्यास अवधी; मात्र आतापासूनच 'गल्ली ते दिल्ली' हालचालींना वेग | 'वेल क्वालिफाईड' चेहऱ्यासाठी मतदारांचा कौल?

​कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

कोरेगाव नगरपंचायतीचा विद्यमान कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ रोजी संपुष्टात येत आहे. अद्याप निवडणुकीला अवधी असला तरी, कोरेगाव शहराच्या सत्तेच्या चाव्या हस्तगत करण्यासाठी राजकीय धुरिणांनी आतापासूनच शड्डू ठोकले आहेत. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी इच्छुकांची मोठी फौज मैदानात उतरली असून, सुपारी-साखरपान आणि गाठीभेटींच्या राजकारणाने शहरात 'इलेक्शन मोड' ऑन झाला आहे.

​इच्छुकांची मांदियाळी: बड्या नावांची चर्चा

​यावेळची निवडणूक चुरशीची होणार असून, अनेक दिग्गज आणि तरुण चेहरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

​ राहुल रघुनाथ बर्गे, राहुल प्रकाश बर्गे, राजाभाऊ फत्तेसिंग बर्गे, डॉ. आशुतोष नारायण बर्गे, डॉ. रोहन गजानन बर्गे, श्रीमती प्रतिभाताई शिवाजीराव बर्गे, अमर शहाजीराव बर्गे, सचिन बर्गे, सुनील दादा बर्गे, उपनगराध्यक्ष संजय लक्ष्मण पिसाळ, पृथ्वीराज शिवाजीराव माने, , जयवंत राजाराम पवार, बच्चूशेठ ओसवाल, संजय झंवर.आदी मान्यवर नगराध्यक्ष पदाच निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .

​या नावांसह इतरही अनेक पडद्यामागचे शिलेदार योग्य संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे ही निवडणूक 'बहुरंगी' आणि 'काटे की टक्कर' देणारी ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

​देवदर्शन, जेवणावळी आणि जनसंपर्क!

​मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांनी आता 'देवदर्शन' मोहिमेचा आधार घेतला आहे. लग्नसराई, वाढदिवस आणि विविध सामाजिक कार्यक्रमांतून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. अनेक प्रभागांमध्ये 'जेवणावळी' आणि सहलींचे आयोजन करून मतदारांची नाडी ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

​मतदारांचा कल: 'सुशिक्षित आणि व्हिजनरी' नेतृत्वाला पसंती?

​यावेळच्या निवडणुकीत कोरेगावकर मतदार काहीसा वेगळा विचार करत असल्याचे चित्र आहे. केवळ पारंपरिक राजकारणाला महत्त्व न देता “वेल क्वालिफाईड” आणि शहराच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराला संधी देण्याची चर्चा चौकाचौकांत रंगू लागली आहे.

​नागरिकांच्या प्रमुख अपेक्षा:

​पायाभूत सुविधा: रस्ते आणि सांडपाणी नियोजनाचा प्रश्न.

​स्वच्छता व आरोग्य: कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण.

​वाहतूक कोंडी: वाढत्या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे.

​पाणीपुरवठा: शहराला पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा.

​कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही हालचाली

या निवडणुकीचे पडसाद केवळ कोरेगाव शहरातच नव्हे, तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही उमटताना दिसत आहेत. आगामी काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची चिन्हे असून, नवीन आघाड्या आणि गट-तट यांची बांधणी सुरू झाली आहे. प्रस्थापित नेत्यांसमोर नव्या दमाच्या उमेदवारांचे आव्हान उभे राहणार असल्याने ही लढत शहराच्या भविष्यासाठी 'निर्णायक' ठरणार आहे.

​पुढील काही महिन्यांत राजकीय धुराळा अधिकच उडणार असून, कोरेगावच्या 'नगराध्यक्षपदाची' माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.