जिल्हा परिषदेवर 'स्वीकृत' म्हणून राजाभाऊ बर्गे यांना संधी देण्याची जनतेतून मागणी कोरेगावच्या विकासासाठी बर्गे यांना 'ताकद' द्या!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून 'बर्गे कार्ड' खेळले जाणार का?
26 April, 2026
कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:- कोरेगाव शहराचा विस्तार आणि तालुक्याच्या विकासाचा वाढता आलेख पाहता, स्थानिक राजकारणात आता अनुभवी व सक्षम नेतृत्वाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी शहराच्या विकासात टाकलेली पायाभरणी आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क विचारात घेता, त्यांना जिल्हा परिषदेवर 'स्वीकृत सदस्य' म्हणून संधी द्यावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये योग्य वेळी योग्य ताकद देऊ असा शब्द दिला होता, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य करून राजा बर्गे यांना ताकद द्यावी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी राजाभाऊ बर्गे हे इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी काही राजकीय गणिते आणि संघटनात्मक निर्णयामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यावेळी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत "राजाभाऊंना योग्य वेळी न्याय दिला जाईल आणि त्यांना राजकीय ताकद दिली जाईल," असा शब्द दिला होता. आता जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीचे वारे वाहू लागल्याने, 'त्या' शब्दाची अंमलबजावणी करून बर्गे यांना संधी मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अनुभवाचा फायदा विकासाला राजाभाऊ बर्गे यांनी कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराचा कायापालट करण्यासाठी विशेष कष्ट घेतले आहेत. पाणीपुरवठा योजना, रस्ते खडीकरण, स्वच्छता आणि नियोजित नगररचना यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी प्रशासकीय पकड निर्माण केली होती. कोरेगावची वाटचाल आता नगरपरिषदेकडे सुरू असताना, त्यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची जिल्हा परिषदेत उपस्थिती तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
विधानसभेची मोर्चेबांधणी? राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शिवसेनेसाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. बर्गे यांना जिल्हा परिषदेवर संधी दिल्यास मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. ग्रामीण भागातील संपर्क अधिक दृढ होऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल. एक सक्षम आणि आश्वासक चेहरा म्हणून भविष्यातील निवडणुकीत त्यांचा उपयोग होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.
जनतेचा रेटा वाढला तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी आता या मागणीसाठी कंबर कसली आहे.. प्रशासकीय कामाचा अनुभव आणि जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या राजाभाऊ बर्गे यांना संधी देऊन कोरेगावच्या विकासाला गती द्यावी, हीच भावना सध्या जनमानसात उमटत आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!