बेंगळुरू येथील 'हायरॉक्स' स्पर्धेत साताऱ्याच्या यश मुचंडी यांची दमदार कामगिरी
सिव्हिल इंजिनिअर ते एंड्युरन्स चॅम्पियन; आंतरराष्ट्रीय स्तरावर साताऱ्याचा झेंडा फडकवला
18 April, 2026
बेंगळुरू येथील 'हायरॉक्स' स्पर्धेत साताऱ्याच्या यश मुचंडी यांची दमदार कामगिरी
सिव्हिल इंजिनिअर ते एंड्युरन्स चॅम्पियन; आंतरराष्ट्रीय स्तरावर साताऱ्याचा झेंडा फडकवला
सातारा : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:
बेंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण अशा 'हायरॉक्स' (HYROX) फिटनेस स्पर्धेत साताऱ्याच्या यश मुचंडी यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी १ तास ४२ मिनिटे १२ सेकंद अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत साताऱ्याचे नाव क्रीडा नकाशावर अभिमानाने उंचावले आहे.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमता विशेष उल्लेखनीय ठरली. हायरॉक्स ही जगभरात लोकप्रिय फिटनेस रेस असून, यात धावणे (रनिंग) आणि विविध 'फंक्शनल वर्कआउट्स'च्या आठ टप्प्यांचा समावेश असतो. या स्पर्धेसाठी उच्च दर्जाचा फिटनेस, स्टॅमिना आणि मानसिक ताकदीची कसोटी लागते.
जिद्द आणि चिकाटीचा प्रवास
यश मुचंडी हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असून, त्यांनी क्रीडा आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा उत्तम समतोल राखला आहे. 'अल्ट्रा एंड्युरन्स' ॲथलीट म्हणून त्यांनी साताऱ्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध आव्हानात्मक स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवून यश मिळवणारे ते साताऱ्यातील मोजकेच खेळाडू आहेत.
यशात मार्गदर्शक व कुटुंबाचा वाटा
या यशाबद्दल बोलताना यश मुचंडी यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबियांच्या पाठबळाला दिले. कठोर प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण दिनचर्या यासाठी कुटुंबाने दिलेले प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'सातारा हिल रनर्स' या संस्थेचे मोठे योगदान असून, मार्गदर्शक डॉ. सुधीर पवार, जयंत शिदे, संतोष जगदाळे आणि संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनामुळेच हे यश साध्य करता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या स्टॅमिनासाठी 'प्रोटीन आयुर शक्ती'चा विशेष उपयोग झाल्याचेही नमूद केले.
यश मुचंडी यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सातारा जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!