single-post

कोरेगावात गुरुवारी जातिवंत खिल्लार जनावरांचे भव्य प्रदर्शन

​भैरवनाथ यात्रा कमिटीचा अभिनव उपक्रम; मुस्लिम बांधवांचा बक्षिसांत सहभाग, जपला सामाजिक ऐक्याचा संदेश

18 April, 2026

कोरेगावात गुरुवारी जातिवंत खिल्लार जनावरांचे भव्य प्रदर्शन

​भैरवनाथ यात्रा कमिटीचा अभिनव उपक्रम; मुस्लिम बांधवांचा बक्षिसांत सहभाग, जपला सामाजिक ऐक्याचा संदेश

कोरेगाव :  जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

अक्षय तृतीयेनिमित्त कोरेगाव नगरीत भरत असलेल्या श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेचे औचित्य साधून यंदा एक अनोखा आणि आदर्शवत उपक्रम राबविण्यात येत आहे. श्री भैरवनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २३ एप्रिल रोजी जातिवंत खिल्लार जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पशुधन संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण परंपरेचे जतन होणार आहे.

​कोरेगाव-रहिमतपूर रोडवरील श्री रेणुका माता मंदिरासमोर हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पशुपालकांसाठी बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी नावनोंदणीची सोय करण्यात आली असून, यासाठी नाममात्र २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. गुरुवारी तज्ज्ञांमार्फत निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

​'भैरवनाथ चॅम्पियन' ठरणार मुख्य आकर्षण

​या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण 'भैरवनाथ चॅम्पियन' ही स्पर्धा असणार आहे. यामध्ये:

  • बैल गट: विजेत्यास ११ हजार रुपये व चषक (पुरस्कर्ते: युवा उद्योजक धनंजय सयाजीराव बर्गे).
  • गाय गट: विजेत्यास ११ हजार रुपये व चषक (पुरस्कर्ते: किरण आनंदराव देशमुख).

​विविध गटांत रंगणार स्पर्धा

​खिल्लार गोमाता व नंदी श्रेणीमध्ये जुळीक/सहादाती, चारदाती, दोनदाती तसेच आदत (१ वर्षांवरील व १ वर्षांखालील) अशा विविध गटांत स्पर्धा पार पडणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना खालीलप्रमाणे बक्षिसे दिली जातील:

  1. प्रथम क्रमांक: ५,००० रुपये
  2. द्वितीय क्रमांक: ३,००० रुपये
  3. तृतीय क्रमांक: २,००० रुपये
  4. उत्तेजनार्थ: १,००० रुपये

​सामाजिक सलोख्याचे दर्शन

​या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध गटांतील बक्षिसांसाठी मुस्लिम बांधवांनी सढळ हाताने मदत केली आहे. यामध्ये तोसिफ बेपारी, मुकतदिर सौदागर, सुलतान सौदागर, जिशान सौदागर, वारीस कुरेशी, सादिक कुरेशी, रमजान कुरेशी, समीर कुरेशी, मुकिर सौदागर आणि गफ्फार कुरेशी यांच्यासह अनेक बांधवांनी पुढाकार घेतला आहे. यातून कोरेगावच्या सामाजिक सलोख्याचा आणि भाईचाऱ्याचा एक सुंदर संदेश राज्यभर जात आहे.

पारंपरिक उत्सवात आधुनिकतेची जोड

दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत छबिणा सोहळा, पालखी मिरवणूक, जंगी कुस्त्यांचे मैदान, बैलगाडा शर्यती आणि मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेल असेल. मात्र, यंदा 'खिल्लार प्रदर्शना'मुळे यात्रेची रंगत अधिकच वाढली आहे.


​राज्यातील पशुपालक व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे, उपाध्यक्ष चंद्रकांत बर्गे, सचिव गजानन बर्गे, सहसचिव भानुदास सुतार तसेच कोरेगाव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व ग्रामस्थांनी केले आहे.

संपर्क व माहितीसाठी:

७२१८५००००६, ९९२२१३९०८९, ९६७३२४५६२८