कवठे च्या 'पिवळ्या सोन्याला' हवी संशोधनाची जोड! हळदीचे गाव कवठे!
कवठे गावाची नवी ओळख: आता सातासमुद्रापार गाजणार वाईच्या हळदीचा दर्जा! उद्योजक राहुल डेरे आणि ग्रामस्थांचा निर्धार; शेतीला हवी विज्ञानाची जोड.
15 April, 2026
कवठे च्या 'पिवळ्या सोन्याला' हवी संशोधनाची जोड! हळदीचे गाव कवठे!
सातारा जिल्ह्याने आजवर कृषी क्षेत्रात अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. फलटणचे फळांचे गाव असो वा जावळीचे पुस्तकांचे गाव, या उपक्रमांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. याच धर्तीवर आता वाई तालुक्यातील कवठे गावाला 'हळदीचे गाव' म्हणून घोषित करण्याची आणि तेथे अत्याधुनिक हळद संशोधन केंद्र उभारण्याची मागणी पुढे येत आहे. उद्योजक राहुल डेरे आणि कवठे येथील जागरूक ग्रामस्थांनी यांनी केलेली ही मागणी केवळ एका गावाची नसून, ती संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्याची नांदी आहे.
हळदीचे जागतिक केंद्र: कवठे
वाई तालुका, विशेषतः कवठे परिसर, आज हळद उत्पादनात राज्यात आघाडीवर आहे. येथील हळदीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेले करकुमीनचे ५ ते ६ टक्के प्रमाण. जागतिक बाजारपेठेत ज्या हळदीला सर्वाधिक मागणी असते, ती गुणवत्ता कवठ्याच्या मातीत नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत येथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आणि गादीवाफा पद्धतीचा अवलंब करून उत्पादकता वाढवली आहे. आज कवठे हे हळदीचे एक प्रमुख मार्केट म्हणून उदयास येत असताना, त्याला आता शासकीय मान्यतेची आणि संशोधनाची जोड मिळणे काळाची गरज आहे.
संशोधन केंद्राची अपरिहार्यता
उद्योजक राहुल डेरे आणि ग्रामस्थांनी खासदार नितीन पाटील व राज्य शासन यांच्याकडे केलेली संशोधन केंद्राची मागणी अत्यंत रास्त आहे. हळद हे पीक अत्यंत संवेदनशील असते. कंदकुजसारखे रोग किंवा हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. जर कवठे येथे स्थानिक स्तरावर संशोधन केंद्र उभे राहिले, तर:
- हवामान पूरक वाण: स्थानिक मातीला साजेसे आणि रोगप्रतिकारक वाण विकसित करता येतील.
- मूल्यवर्धन: हळद केवळ कच्चा माल म्हणून न विकता, त्यावर प्रक्रिया करून पावडर, तेल आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.
- थेट निर्यात: जागतिक मानकांनुसार पॅकेजिंग आणि गुणवत्ता तपासणीची सोय झाल्यास कवठ्याची हळद थेट सातासमुद्रापार पोहोचू शकेल.
लोकहिताचा अजेंडा
कवठे गावाला 'हळदीचे गाव' म्हणून मान्यता मिळाल्यास येथे कृषी पर्यटनाला मोठी चालना मिळेल. ज्याप्रमाणे भिलारला पर्यटकांची मांदियाळी असते, तशीच गर्दी कवठ्यात होईल. यामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर छोटे व्यावसायिक, तरुण बेरोजगार आणि महिला बचत गटांचेही आर्थिक सक्षमीकरण होईल. राहुल डेरे यांच्यासारख्या उद्योजकांनी आणि ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार गावच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज
'गोंडवन २८' आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे; त्यांनी गुणवत्तेच्या जोरावर आपले नाव कमावले आहे. आता चेंडू सरकारच्या आणि प्रशासनाच्या दरबारात आहे. सातारा जिल्ह्याच्या कृषी वैभवात भर टाकणारा हा प्रस्ताव तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे. कवठ्याला 'हळदीचे गाव' घोषित करणे आणि तेथे संशोधन केंद्र उभारणे, हा केवळ एका पिकाचा विकास नसून ती ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीची नवी वाट ठरेल.
- सुरेश बोतालजी संपादक, जरंडेश्वर समाचार

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!