single-post

रविवारपासून श्री भैरवनाथ यात्रेचा शुभारंभ; १९ ते २६ एप्रिल दरम्यान भक्तिमय जल्लोष

अक्षय तृतीयेपासून उत्सवाला प्रारंभ; छबिना, सोंगे, शर्यतींचा थरार , कुस्त्या आणि लावणी महोत्सवाची मेजवानी

17 April, 2026

कोरेगाव | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):

लेखक-सूरेश बोतालजी, कोरेगाव 

मो-९१ १२ ६५० ६५०

------------------------------

सातारा जिल्ह्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नकाशावर केंद्रस्थानी असलेल्या कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांची ऐतिहासिक यात्रा यंदा दि. १९ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. झपाट्याने 'मेगा सिटी'कडे वाटचाल करणाऱ्या कोरेगावचा विकास आणि येथील पुरातन परंपरा यांचा एक अनोखा संगम या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. तसेच श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे , उपाध्यक्ष चंद्रकांत बर्गे ,सचिव गजानन बर्गे, सहसचिव भानुदास सुतार तसेच सर्व नगरसेवक नगरपंचायत कोरेगाव आदी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

​अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी संपूर्ण कोरेगाव नगरी सजली असून 'चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. कोरेगावचे श्री भैरवनाथ मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून, 'नवसाला पावणारा देव' म्हणून या परिसराची ख्याती आहे. यात्रेनिमित्त मुंबई, पुण्यासह राज्यभरातून भाविक कोरेगावात दाखल झाले आहेत.

यात्रेतील प्रमुख आकर्षणांची मेजवानी

​यावर्षी यात्रा समिती आणि नगरपंचायतीने भाविकांसाठी आणि  भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे:

  • पालखी सोहळा व सोंगांची रंगत (१९ एप्रिल): रविवारी रात्री ९ वाजता श्रींची पालखी मिरवणूक व छबिना निघणार आहे. यात सामाजिक संदेश देणारी सामूहिक व वैयक्तिक सोंगे आकर्षणाचे केंद्र असतील. उत्कृष्ट सामूहिक सोंगांना ५ ते १७ हजार रुपयांपर्यंत, तर वैयक्तिक सोंगांना ७५१ ते ३,३५१ रुपयांपर्यंत रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
  • बैलगाडा शर्यत (२१ एप्रिल): मंगळवारी सकाळी ७ वाजता जुनी फाटी (रेणुका मंदिराजवळ) येथे थरारक बैलगाडा शर्यती रंगणार आहेत. प्रथम क्रमांकास १,०१,०८२ रुपयांपासून ते १५,०८२ रुपयांपर्यंत नऊ मोठी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
  • भव्य कुस्ती आखाडा (२२ एप्रिल): बुधवारी दुपारी ४ वाजता बाजारपेठ मैदानावर नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.
  • राज्यस्तरीय डान्स स्पर्धा (२४ एप्रिल): शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ग्रुप आणि सोलो डान्स स्पर्धा होतील. ग्रुप डान्ससाठी २५ हजार, तर सोलो डान्ससाठी ११ ते १५ हजार रुपयांची आकर्षक पारितोषिके ठेवली आहेत.
  • महिलांसाठी 'न्यू.होम मिनिस्टर' (२५ एप्रिल): शनिवारी रात्री ९ वाजता क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांचा 'न्यू होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम होईल. विजेत्या महिलांना फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि मानाची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
  • लावणी महोत्सव (२६ एप्रिल): यात्रेची सांगता रविवारी रात्री ९ वाजता 'बारा गावच्या  अप्सरा' तसेच लावण्या मदन मंजिरी यांचा बहारदार लावणी कार्यक्रमाने होणार आहे.


​"स्वच्छ आणि सुरक्षित यात्रा" हे ब्रीद घेऊन कोरेगाव नगरपंचायत आणि यात्रा समितीने चोख नियोजन केले आहे.

  • सुरक्षा: गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • नियम: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर निर्बंध असून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
  • प्राणी संरक्षण: बैलगाडा शर्यतीत प्राण्यांवरील अत्याचाराबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

एकतेचे प्रतीक: कोरेगावची यात्रा

​राजकीय मतभेद बाजूला सारून संपूर्ण गाव 'एकसंघ' होऊन ही यात्रा साजरी करतो, हेच कोरेगावचे वैशिष्ट्य आहे. "बदलत्या काळानुसार आधुनिकतेची जोड देत आपली संस्कृती जपण्याचा हा श्री भैरवनाथ यात्रा कमिटीचा प्रामाणिक प्रयत्न आहे," असा विश्वास यात्रा समिती व नगरपंचायत सदस्यांनी व्यक्त केला आहे.

​कोरेगावची ही यात्रा  धार्मिक उत्सवा बरोबरच, ती या नगरीच्या विकासाची आणि अस्मितेची नवी ओळख करून देणारी ठरत आहे.