रहिमतपुरात मद्यधुंद कारचालकाचा थरार; तरुणी जखमी, २४ तासांनंतर 'खाकी'ला जाग!
मिरवणुकीत 'हिट-अँड-रन'चा प्रकार; तक्रार घेण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ; संतापानंतर अज्ञात चालकावर गुन्हा दाखल
17 April, 2026
रहिमतपुरात मद्यधुंद कारचालकाचा थरार; तरुणी जखमी, २४ तासांनंतर 'खाकी'ला जाग!
मिरवणुकीत 'हिट-अँड-रन'चा प्रकार; तक्रार घेण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ; संतापानंतर अज्ञात चालकावर गुन्हा दाखल
रहिमतपूर (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा उत्साह रहिमतपुरात असतानाच एका बेदरकार आणि मद्यधुंद कारचालकाने मिरवणुकीत 'हिट-अँड-रन' करत एका तरुणीला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, या गंभीर घटनेनंतर तक्रार नोंदवून घेण्यासाठी रहिमतपूर पोलिसांनी तब्बल २४ तास टाळाटाळ केल्याचा खळबळजनक आरोप जखमीच्या कुटुंबीयांनी केला आहे. वाढत्या जनक्षोभानंतर अखेर पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोनाली विवेक गायकवाड (वय २८, रा. आंबेडकर नगर, रहिमतपूर) या आपली लहान बहीण मानसी हिच्यासह मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रात्री ८:३० च्या सुमारास ॲक्टिव्हा स्कूटीवरून (क्र. MH 11 DG 6457) मिरवणुकीसाठी गांधी चौकात निघाल्या होत्या. शेडगे यांच्या देशी दारू दुकानासमोर त्यांनी आपली स्कूटी उभी केली असताना, नगरपालिकेच्या बाजूने एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात आली. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते आणि कार वेडीवाकडी वळणे घेत थेट स्कूटीवर येऊन धडकली.
मद्यधुंद अवस्थेत चालक पसार
या भीषण धडकेत सोनाली आणि मानसी या दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात सोनाली यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी माणुसकीला काळिमा फासत त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. नातेवाईकांनी जखमी सोनाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. "अपघातानंतर तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊनही २४ तास आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही," असा आरोप जखमीचे वडील विवेक गायकवाड यांनी केला आहे. पोलिसांच्या या 'थंडा' कारभारामुळे गुन्हेगाराला पळून जाण्यास पाठबळ मिळत आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अखेर गायकवाड कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
रहिमतपूर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गांधी चौक आणि नगरपालिका परिसरातील फुटेजमध्ये त्या पांढऱ्या कारचा आणि चालकाचा छडा लागण्याची शक्यता आहे. एस. एन. कांबळे (म.पो.हवा.) या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
आंदोलनाचा इशारा
"पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास जी दिरंगाई केली, त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. जर आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— विवेक गायकवाड (जखमीचे वडील)
तपासाची सद्यस्थिती:
- फिर्यादी: सोनाली विवेक गायकवाड
- आरोपी: अज्ञात पांढऱ्या कारचा चालक
- पोलीस ठाणे: रहिमतपूर
- कलम: भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!