कोरेगावात शंभूराज देसाईंचा राजकीय शक्तिप्रदर्शनातून आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का!
सचिन शेलार यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय; आकाश साबळे यांचे वाहनांच्या ताफ्यासह शक्तिप्रदर्शन; कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र
29 November, 2026
कोरेगावात शंभूराज देसाईंचा राजकीय शक्तिप्रदर्शनातून आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का!
सचिन शेलार यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय; आकाश साबळे यांचे वाहनांच्या ताफ्यासह शक्तिप्रदर्शन; कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र
कोरेगाव : सातारा जिल्ह्याचे राजकीयदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोरेगाव शहरात पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन शेलार आणि आकाश साबळे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने कोरेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेने केलेले शक्तिप्रदर्शन आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार दीपक चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजेभाऊ बर्गे यांनी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात सचिन शेलार आणि आकाश साबळे यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय चर्चेला वेगळेच वळण मिळाले.
सचिन शेलार यांच्यासोबत हजारोंचा जनसमुदाय; खांद्यावर उचलून स्टेजपर्यंत मिरवणूक!
सचिन शेलार यांच्या पक्षप्रवेशावेळी कोरेगाव शहरात कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय जमला होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सचिन शेलार यांना खांद्यावर उचलून घेत थेट व्यासपीठापर्यंत आणले. घोषणाबाजी, उत्साह आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण निर्माण झाले होते.
दुसरीकडे, आकाश साबळे यांचे समर्थक वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह कोरेगाव शहरात दाखल झाले होते. वाहनांचा ताफा आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती यामुळे या पक्षप्रवेश सोहळ्याला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले.
शिवसेना पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरेगावमध्ये झालेल्या या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
आमदार महेश शिंदेंना राजकीय धक्का?
आमदार महेश शिंदे यांच्या निकटवर्तीयांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने या घडामोडीकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून पाहता येणार नाही. स्थानिक राजकारणातील कार्यकर्त्यांची ताकद, नेतृत्वावरील विश्वास आणि आगामी निवडणुकीतील संभाव्य समीकरणे या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा ठरू शकतो.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या शक्तिप्रदर्शनाने कोरेगावच्या राजकारणात नवा संदेश दिल्याचे मानले जात आहे.
कोरेगावमध्ये बदलते सत्तासमीकरण; आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार?
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सध्या वेगाने बदलताना दिसत आहे. एका बाजूला आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या सत्तेवर पकड निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक राजकीय प्रभाव आणि त्यांच्या कुटुंबीयांची राजकीय भूमिका चर्चेत आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे.
त्यातच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढताना दिसत आहे. नव्या कार्यकर्त्यांचे प्रवेश, स्थानिक पातळीवरील शक्तिप्रदर्शन आणि सत्तेतील सहभाग यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
आजच्या परिस्थितीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका पक्षासाठी निवडणूक सोपी राहिलेली नाही. आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना आपापली ताकद पणाला लावावी लागणार असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
आगामी काळात जमिनीवर पाय असणारा, जनतेत मिसळणारा उमेदवारच बाजी मारणार!
राजकारणातील बदलत्या परिस्थितीत केवळ पक्षाचे नाव, सत्ता किंवा आर्थिक ताकद यावर निवडणुका जिंकता येतीलच असे नाही. मतदारसंघातील सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, कार्यकर्त्यांना सन्मान देणारा, जनतेच्या अडचणीच्या काळात धावून जाणारा आणि जमिनीवर पाय ठेवून काम करणारा उमेदवारच आगामी काळात जनतेच्या पसंतीस उतरेल.
जनतेला आपला वाटणारा, कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवणारा आणि विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा नेता निवडून देण्याकडे मतदारांचा कल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात नव्या नेतृत्वालाही संधी निर्माण होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकंदरीत, कोरेगाव शहरात झालेल्या या पक्षप्रवेशाने शिवसेनेच्या वाढत्या राजकीय ताकदीचे दर्शन घडविले आहे. शंभूराज देसाईंचे नेतृत्व, सचिन शेलार आणि आकाश साबळे यांचा प्रवेश आणि कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन यामुळे कोरेगावच्या राजकारणात नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात या घडामोडींचे परिणाम कोणाच्या राजकीय भवितव्याला बळ देणार आणि कोणाला आव्हान निर्माण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जरंडेश्वर समाचार | कोरेगाव

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय