single-post

साताऱ्यात लोकशाहीच्या मंदिराचे दर्शन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संसद भवनाची देखणी प्रतिकृती

संसदेची हुबेहूब प्रतिकृती ठरतेय सातारकरांच्या आकर्षणाचे केंद्र! ​विद्युत रोषणाईने उजळला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; भीमअनुयायांची मोठी गर्दी. ​भव्य सेट आणि देखणी सजावट; साताऱ्यात साकारले 'लोकशाहीचे शक्तिपीठ'.

12 April, 2026

साताऱ्यात लोकशाहीच्या मंदिराचे दर्शन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संसद भवनाची देखणी प्रतिकृती

सातारा | जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा नगर परिषदेने यंदा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. सातारा नगरपालिकेसमोर असलेल्या डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात चक्क 'भारतीय संसद भवनाची' भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सातारकरांनी या परिसरात मोठी गर्दी केली असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

संकल्पना आणि नियोजन

​नगर परिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकाराला आला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांतून भव्य सेट, विद्युत रोषणाई आणि देखणी सजावट करण्यात आली आहे. "शहराचा सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक भान जपणारा हा उपक्रम स्तुत्य आहे," अशा भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

उत्सवी वातावरण आणि कार्यक्रम

​१४ एप्रिल रोजी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या परिसरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये:

  1. मान्यवरांचा सत्कार: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव.
  2. अभिवादन सोहळा: पहाटेपासूनच पुतळा परिसरात भीमअनुयायांची गर्दी अपेक्षित आहे.
  3. सांस्कृतिक कार्यक्रम: संविधानावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल.

 विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने चहा नाश्ता जेवण पाणी बॉटल आधीची पूर्ण सोय केलेली आहे.

सातारा नगर परिषदेचा हा उपक्रम केवळ सजावट नसून, ती आधुनिक भारताच्या निर्मितीचे प्रतीक असलेल्या संविधानाचा सन्मान करणारी कृती आहे. सातारकरांच्या या सामाजिक एकात्मतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यातल्या आंबेडकरी समुदायाच्या वतीने नगरपालिकेचे खूप खूप अभिनंदन !सुरेश बोतालजी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार!