साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध मान्यवरांचे विनम्र अभिवादन! साताऱ्यात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
साताऱ्यात भीमजयंतीचा उत्साह; आमदार शशिकांत शिंदें यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून वंदन केले
14 April, 2026
साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांचे विनम्र अभिवादन
सातारा | दि. १४ (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह आज सातारा शहरात पाहायला मिळाला. यानिमित्ताने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या महामानवाच्या विचारांना यावेळी उजाळा देण्यात आला.
साताऱ्यात आंबेडकरी समुदायाच्या वतीने आजपर्यंतच्या सर्व जयंतीचा उत्साहचा रेकॉर्ड मोडला, प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळी पासून आंबेडकरी समुदाय येत होता.
मान्यवरांची उपस्थिती आणि पुष्पहार अर्पण
सकाळपासूनच आंबेडकर पुतळा परिसर 'जय भीम'च्या घोषाने दुमदुमून गेला होता. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, सुवर्णाताई पाटील, सुनील काळेकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
विचारांची प्रस्थापना आणि आवाहन
अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना मान्यवरांनी बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
संघर्षमय जीवनातून प्रेरणेचा जागर
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय प्रवासाचा आढावा घेतला. अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांची जिद्द आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास सातारा शहरातील नागरिक, भीमसैनिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शहरात जयंतीनिमित्त उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण दिसून आले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!