साताऱ्यात ‘समता दिंडी’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
प्रतापसिंह हायस्कूल ते नगरपालिकेपर्यंत दिंडीची जल्लोषात वाटचाल मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेडकरांना अभिवादन समतेच्या विचारांनी भारावले साताऱ्याचे वातावरण घोषणांच्या जयघोषात सामाजिक ऐक्याचा संदेश
14 April, 2026
साताऱ्यात ‘समता दिंडी’ उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
सातारा, दि. १४ : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात भव्य ‘समता दिंडी’ मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीत विद्यार्थी, नागरिक आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दिंडीची सुरुवात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिंडीला प्रारंभ झाला.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रतापसिंह हायस्कूल येथून निघालेली दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सातारा नगर पालिका येथे असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी पोहोचली. यावेळी सर्व मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी बोलताना, डॉ. आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक समतेचा संदेश दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात दिंडीत सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण सातारा शहर आंबेडकरमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!