कोरेगाव शहराचा 'कचरा' कोंडाळा; स्वच्छ भारत अभियानाला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण!
नगरपंचायतीचा स्वच्छतेचा 'नारा' ठरतोय केवळ 'फार्स'! एसी केबिनमध्ये बसून कारभार; गल्लीबोळात मात्र दुर्गंधीचा विळखाप्रशासकीय सुस्ती न हटल्यास नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर कचरा ओतण्याचा इशारा!
13 April, 2026
कोरेगाव शहराचा 'कचरा' कोंडाळा; स्वच्छ भारत अभियानाला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण!
प्रत्येक प्रभागात घंटागाडीची 'बोंब' | ठेकेदाराची मनमानी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिक आरोग्याच्या टांगत्या तलवारीखाली
कोरेगाव: जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-
केंद्र शासनाच्या 'स्वच्छ भारत अभियान २०२६' अंतर्गत “स्वच्छ कोरेगाव, सुंदर कोरेगाव” असा गुलाबी नारा देणाऱ्या कोरेगाव नगरपंचायतीचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. शहराच्या एका विशिष्ट भागापुरती ही समस्या मर्यादित नसून, संपूर्ण कोरेगाव शहरात घंटागाडीच्या अनियमिततेमुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे 'सुंदर कोरेगाव'चा संकल्प आता केवळ कागदी घोडा ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
गल्लीगल्लीत घरासमोर कचऱ्याचे डबे, घंटागाडीचा पत्ताच नाही!
शहरातील प्रत्येक प्रभागात आज हीच 'बोंब' आहे. घंटागाडी कधी येईल, याचा कोणताही निश्चित वेळ राहिलेला नाही. अ गाडी कधी येईल याचा काही अंदाज नसल्याने नागरिकांना ओला आणि सुका कचरा घरातच साठवून ठेवावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे घरात दुर्गंधी पसरत असून, लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नाईलाजास्तव नागरिक रात्रीच्या वेळी कचरा उघड्यावर फेकत आहेत.
ठेकेदारीचा 'झोल' की प्रशासनाचे 'वरदहस्त'?
कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या ठेकेदारावर नगरपंचायतीचे शून्य नियंत्रण असल्याचे वास्तव समोर आले आहे. चालक आणि व्यवस्थापक यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याने हे कर्मचारी नागरिकांना जुमानत नाहीत. "टॅक्स आम्ही वेळेवर भरतो, मग सुविधा का मिळत नाही?" असा संतप्त सवाल करदात्यांनी उपस्थित केला आहे. सध्याची ठेकेदारी पद्धत ही केवळ खिसे भरण्याचे साधन बनली असून, ती रद्द करून नगरपंचायतीने स्वतः कचरा व्यवस्थापन हाती घ्यावे, अशी मागणी आता शहराच्या कानाकोपऱ्यातून जोर धरत आहे.
ठळक मुद्दे आणि नागरिकांचा रोष:
- अनियमित सेवा: घंटागाडी येण्याच्या वेळा निश्चित नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय.
- आरोग्य धोक्यात: साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या रोगांची भीती.
- रोजगाराचा प्रश्न: ठेकेदारी बंद करून स्थानिक तरुणांना कचरा संकलनाच्या कामात प्राधान्य देण्याची मागणी.
- प्रशासकीय सुस्ती: मुख्याधिकारी आणि संबंधित विभागाकडून केवळ आश्वासने.
“कागदावर स्वच्छ, प्रत्यक्षात अस्वच्छ!”
कोरेगावचा विकास केवळ फ्लेक्सवर दिसत आहे. प्रभागातील कचरा वेळेवर उचलला जात नसेल, तर या अभियानाचा काय उपयोग? प्रशासनाने एसी केबिनमधून बाहेर पडून गल्लीबोळातली परिस्थिती पहावी. आता केवळ तोंडी तक्रार नाही, तर मुख्याधिकाऱ्यांना लेखी जाब विचारला जाईल.
— कोरेगावचे सजग नागरिक
आता लढा आरपारचा!
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, यापुढे केवळ चर्चा न करता नगरपंचायत प्रशासनावर लेखी निवेदनांचा पाऊस पाडावा. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष यांच्या दालनात निवेदने देऊन त्याच्या प्रती माध्यमांना द्याव्यात, जेणेकरून या 'कचराकोंडी'चा प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवता येईल.
प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास, संपूर्ण कोरेगावकर नगरपंचायतीच्या उंबरठ्यावर कचरा ओतून आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!