दुष्काळग्रस्त १५ गावांसाठी ‘गाव दत्तक योजना’ राबवा!
उद्योगपती, राजकीय नेते आणि दानशूर व्यक्तींना सहभागी करून प्रत्येक गावाला चार ते पाच पाण्याचे टँकर उपलब्ध करा; मदत करणाऱ्यांचा शासनाने सन्मान करून आयकर सवलत द्यावी – सुरेश बोतालजी यांची मागणी
17 November, 2026
दुष्काळग्रस्त १५ गावांसाठी ‘गाव दत्तक योजना’ राबवा!
उद्योगपती, राजकीय नेते आणि दानशूर व्यक्तींना सहभागी करून प्रत्येक गावाला चार ते पाच पाण्याचे टँकर उपलब्ध करा; मदत करणाऱ्यांचा शासनाने सन्मान करून आयकर सवलत द्यावी – सुरेश बोतालजी यांची मागणी
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांसह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभिनव ‘गाव दत्तक योजना’ राबवावी, अशी मागणी लोक पँथरचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश बोतालजी यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ शासकीय टँकरवर अवलंबून न राहता समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे.
यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त १५ गावांची निवड करून प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ‘गाव दत्तक योजना’ सुरू करावी. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील उद्योगपती, व्यावसायिक, राजकीय नेते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना सहभागी करून घ्यावे. प्रत्येक दत्तक गावाला किमान चार ते पाच पाण्याचे टँकर नियमित उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित दानशूर व्यक्ती किंवा संस्थेने स्वीकारावी.
या उपक्रमामुळे पाणीटंचाईच्या काळात गावांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. तसेच शासनावरील पाणीपुरवठ्याचा आर्थिक व प्रशासकीय ताणही काही प्रमाणात कमी होऊ शकेल. जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण योजनेचे नियोजन, देखरेख आणि पारदर्शक अंमलबजावणी करावी. टँकरच्या फेऱ्या, पाण्याची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष वितरण यावरही प्रशासनाने लक्ष ठेवावे.
मदत करणाऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन द्यावे
या सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योगपती, राजकीय नेते आणि दानशूर व्यक्तींचा राज्य शासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात यावा. तसेच गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आर्थिक मदत किंवा टँकर उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना नियमानुसार आयकर सवलत देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशीही मागणी बोतालजी यांनी केली आहे.
केवळ निवडणुकीच्या काळात किंवा एखाद्या संकटाच्या वेळी मदत करण्याऐवजी दुष्काळी गावांच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नाकडे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून पाहण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास अनेक गावांची तहान भागविणे शक्य आहे.
‘पाण्यापासून एकही गाव वंचित राहू नये!’
पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत प्रश्न आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शासन, प्रशासन, उद्योगजगत आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात. सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर १५ गावांमध्ये ही योजना सुरू करून तिचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करावा. पाण्याअभावी कोणत्याही गावाला आणि कोणत्याही नागरिकाला वंचित राहावे लागू नये, हाच या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे सुरेश बोतालजी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि सातारा जिल्ह्यात ‘गाव दत्तक योजना’ सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय