जोतिराव फुले : आधुनिक भारताचे दीपस्तंभ आणि समतेचे प्रणेते
द्विशताब्दी जयंती वर्षाचा ऐतिहासिक प्रारंभ | 'शिक्षक दिन' फुले यांच्या नावाने साजरा करण्याची लोकभावना
11 April, 2026
महामानव महात्मा जोतिराव फुले : आधुनिक भारताचे दीपस्तंभ आणि समतेचे प्रणेते
द्विशताब्दी जयंती वर्षाचा ऐतिहासिक प्रारंभ | 'शिक्षक दिन' फुले यांच्या नावाने साजरा करण्याची लोकभावना
सातारा | दि.११ एप्रिल २०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) :-
-सुरेश बोतालजी संपादक
"विद्येविना मती गेली..." हा मंत्र देऊन अज्ञानाच्या अंधकारात बुडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची आज ११ एप्रिल रोजी जयंती. यावर्षीपासून त्यांच्या द्विशताब्दी (२०० व्या) जयंती वर्षाचा प्रारंभ होत आहे. शिक्षण, समता आणि मानुसकीचा विचार मांडणाऱ्या या महामानवाला आज संपूर्ण जग कृतज्ञतेने अभिवादन करत आहे. मानवी हक्कांचा कैवारी आणि जातीभेदाच्या कलंकाविरुद्ध लढा देणारे 'महात्मा जोतिबा फुले आपल्यासाठी आज ही दिशादर्शक आहेत.
स्त्री-शिक्षण आणि सामाजिक समतेचा पाया
महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्या काळात शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, त्या काळात त्यांनी हा क्रांतिकारी लढा उभारला. या कार्यात त्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची खंबीर साथ लाभली. चिखलफेक आणि अपमान सोसूनही या दाम्पत्याने ज्ञानदानाचे कार्य सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवली.
सत्यशोधक समाज : विषमतेविरुद्ध एल्गार
१८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. " समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. जातीभेद हा समाजाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे, हे ओळखून त्यांनी मानुसकीचा धर्म रुजवला. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून त्यांनी कृतीतून समाजपरिवर्तन घडवून आणले.
शिक्षक दिन महात्मा फुलेंच्या नावाने व्हावा : लोकमानस
महात्मा फुले हे आधुनिक भारताचे खरे शिक्षक आहेत. १८८२ मध्ये हंटर आयोगासमोर साक्ष देताना त्यांनी सर्वांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती. राधाकृष्णन यांच्या जन्मापूर्वी ४० वर्षे फुलेंनी शिक्षणाचे कार्य सुरू केले होते. त्यामुळे देशातील 'शिक्षक दिन' महात्मा फुले यांच्या नावाने साजरा करणे, हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता ठरेल.असं देशातील राज्यातील लोकांचं मत आहे असा लोकमानस आहे
जागतिक दर्जाचे विचारवंत आणि राष्ट्रनिर्माते
महात्मा फुले यांचे कार्य जागतिक स्तराचे होते. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याशी केली, तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना 'भारताचे मार्टिन ल्युथर' संबोधिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलेंना आपले 'गुरु' मानले. त्यांचा राष्ट्रवाद हा जात, धर्म किंवा प्रांतापुरता मर्यादित नसून तो 'वैश्विक मानवतावादावर' आधारित होता.
स्थापत्य आणि उद्योजकता : प्रगतीचा नवा मार्ग
अनेकांना अपरिचित असलेला पैलू म्हणजे महात्मा फुले हे एक यशस्वी उद्योजक होते. खडकवासला धरण, कात्रजचा बोगदा आणि पुण्याच्या अनेक पुलांच्या कामात त्यांच्या कंपनीचे योगदान होते. कष्टाने कमावलेला पैसा त्यांनी स्वतःसाठी न वापरता दीन-दलितांच्या आणि शिक्षणाच्या कार्यासाठी खर्च केला. म्हणूनच न्यायमूर्ती पी. बी. सावंत त्यांना 'चंदनासारखा झिजलेला महापुरुष' म्हणतात.
विकृती सोडा, माणुसकी जोपासा : आजच्या काळाची गरज
आज समाज प्रगत झाला असला तरी जातीभेदाची विकृती अजूनही संपलेली नाही. महात्मा फुले यांनी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. आज त्यांच्या द्विशताब्दी वर्षात पदार्पण करताना, केवळ घोषणा न देता त्यांच्या विचारांनुसार 'माणूस' म्हणून जगण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन वैश्विक बंधुत्वाची जोपासना करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
द्विशताब्दी वर्षाचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महात्मा फुले यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याला 'भविष्याचा मार्गदर्शक' म्हटले आहे. "आगृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका" हा संदेश घेऊन, नव्या पिढीने विज्ञानाची कास धरावी आणि माणुसकीचा धर्म जपावा, हाच या विशेष वर्षाचा मुख्य उद्देश असावा.
"ख्रिस्त महंमद मांगास, धरावे पोटाशी बंधुपरी"
हाच प्रगल्भ मानवतावाद आजच्या देशाला वाचवू शकतो. क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा!

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!