single-post

एकनाथ शिंदे यांची ‘ग्रेट’ भेट; कोरेगावच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चाहूल

राजेंद्र बर्गे समर्थकांसह शिवबंधनात अडकणार? | आमदार महेश शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष | मतदारसंघातील समीकरणे बदलणार

11 April, 2026

एकनाथ शिंदे यांची ‘ग्रेट’ भेट; कोरेगावच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चाहूल

राजेंद्र बर्गे समर्थकांसह शिवबंधनात अडकणार? | आमदार महेश शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष | मतदारसंघातील समीकरणे बदलणार

कोरेगाव :दि.११ एप्रिल २०२६ ( जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी कोरेगाव मतदारसंघातील एका महत्त्वपूर्ण शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीने कोरेगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आगामी काळात तालुक्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष व युवा उद्योजक राजेंद्र फत्तेसिंह बर्गे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट पार पडली.

बर्गेंच्या नेतृत्वाखाली शक्तीप्रदर्शन

​या भेटीदरम्यान कोरेगाव शहरासह मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बर्गे हे लवकरच आपल्या हजारो समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. बर्गेंचा जनसंपर्क आणि दांडगा अनुभव पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा 'नवा चेहरा' म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

आमदार महेश शिंदे आणि 'दरी'ची चर्चा

​सध्याचे आमदार महेश शिंदे यांच्या राजकीय भूमिकेबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा आहे. विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील बदललेली समीकरणे आणि त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची भाजपमधून झालेली निवड, यामुळे शिवसेनेत संभ्रमावस्था आहे. याच कारणामुळे आमदार महेश शिंदे आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) लढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

​"आमदार महेश शिंदे आणि राजेंद्र बर्गे यांच्यात सध्या मोठी राजकीय दरी निर्माण झाली असून, त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे."


शिवसेनेचा 'बर्गे' पॅटर्न?

​कोरेगाव मतदारसंघ हा युतीमध्ये शिवसेनेकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर महेश शिंदे भाजपमध्ये गेले, तर शिवसेनेकडे राजेंद्र बर्गे यांच्या रूपाने एक सक्षम आणि मनमिळाऊ नेतृत्व उपलब्ध आहे.

  • नगरपंचायत निवडणूक: आगामी नगरपंचायत निवडणुकीत राजेंद्र बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल उतरवण्याची तयारी सुरू आहे.
  • विधानसभा वेशीवर: बर्गें यांच्या  माध्यमातून शिवसेनेला मतदारसंघात पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होताना दिसत आहे.

कोरेगावच्या राजकारणाला नवी दिशा

​राजेंद्र बर्गे यांचा उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि सर्वसामान्य जनतेतील प्रतिमा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या या 'ग्रेट' भेटीमुळे कोरेगावच्या राजकारणाची दिशा बदलणार हे आता स्पष्ट झाले आहे. आता केवळ अधिकृत पक्षप्रवेशाची आणि पुढील राजकीय चालींची प्रतीक्षा मतदारसंघातील जनतेला लागली आहे.