single-post

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रविवारी रंगणार 'माजी विद्यार्थी' मेळावा

१९४७ ते २०२५ सालातील 'शिवाजीयन्स' एकत्र येणार; आठवणींना मिळणार उजाळा

10 April, 2026

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रविवारी रंगणार 'माजी विद्यार्थी' मेळावा

१९४७ ते २०२५ सालातील 'शिवाजीयन्स' एकत्र येणार; आठवणींना मिळणार उजाळा

सातारा : दि.१०एप्रिल२०२६(जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ अंतर्गत असलेल्या येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये येत्या रविवारी (दि. १२ एप्रिल) माजी विद्यार्थी मेळाव्याचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. तब्बल सात दशकांहून अधिक काळ म्हणजेच १९४७ पासून ते २०२५ पर्यंत या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी एकाच छताखाली जमणार असून, जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

​महाविद्यालय परिसरातील बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृह (हॉल क्र. १४) येथे सकाळी १० वाजता या मेळाव्याचा प्रारंभ होणार आहे. आपल्या लाडक्या 'शिवाजी कॉलेज'शी असलेले नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेजवानी आठवणींची आणि भोजनाचीही!

या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. अनेक वर्षांनंतर भेटणाऱ्या वर्गमित्रांसाठी हा सोहळा भावूक आणि उत्साहाचा ठरणार आहे. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित राहणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी चहा, नाष्टा आणि भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

जय्यत तयारी सुरू

प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व्यवस्थापन समिती, सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. आजी-माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

आवाहन...

"१९४७ ते २०२५ या कालावधीत महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रांना या मेळाव्याची माहिती द्यावी. या स्नेहसंमेलनास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.