single-post

कोरेगावच्या दिवाण वाडा परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी; उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या तत्परतेने नागरिकांना दिलासा

कोरेगाव नगरपंचायतीचा 'ऍक्शन मोड'; नागरिकांच्या समस्यांवर ऑन-द-स्पॉट तोडगा:​'जनसेवा हीच ईश्वर सेवा'; उपनगराध्यक्ष राहुल बर्गेंकडून शब्दाची पूर्तता

05 April, 2026

कोरेगावच्या दिवाण वाडा परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी; उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या  तत्परतेने नागरिकांना दिलासा

कोरेगाव : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

कोरेगाव बाजारपेठेतील दिवाण वाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याच्या गंभीर समस्येने नागरिक त्रस्त होते. या तक्रारीची दखल घेत उपनगराध्यक्ष राहुल बर्गे व नगरसेवक सचिन बर्गे यांनी तातडीने कार्यवाही करत सांडपाण्याचा निचरा करून दिला. तसेच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे कामही पूर्ण केल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

नेमकी समस्या काय होती?

​दिवाण वाडा परिसरात नगरपंचायतीमार्फत एका जुन्या आडाद्वारे तीन गल्ल्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या आडाच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. स्थानिकांनी ही बाब पत्रकार दादा वाकडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने प्रशासकीय स्तरावर हालचाली केल्या.

प्रशासकीय तत्परता

​या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राहुल बर्गे आणि नगरसेवक सचिन भैय्या बर्गे यांनी विलंब न लावता नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करून पाण्याचा निचरा करण्यात आला. यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

"जनतेची सेवा हीच आमची प्राथमिकता आहे. कोरेगाव शहरातील नागरिकांना कोणत्याही नागरी समस्या भेडसावत असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा. शहराचा विकास आणि नागरिकांचे आरोग्य याला आमचे पहिले प्राधान्य असेल."

राहुल बर्गे, उपनगराध्यक्ष, कोरेगाव.