single-post

चिमुरड्याच्या आर्त हाकेने स्मशानभूमी हेलावली; 'सुट्टी मेकर' अमित कवळे पंचतत्वात विलीन

​चिमुरड्याची आर्त हाक:

06 April, 2026

"पप्पा उठा ना..." त्या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या आर्त हाकेने स्मशानभूमी हेलावली; 'सुट्टी मेकर' अमित कवळे पंचतत्वात विलीन

गोरेगाव (वांगी) : जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-

ज्या हातांनी कालपर्यंत मैदानात विजयाचा गुलाल उधळला, त्याच हातांनी आज निरोप घेताना अख्ख्या गावाला रडवले. गोरेगाव वांगी ,खटाव तालुक्यातील प्रसिद्ध 'सुट्टी मेकर' पैलवान अमित चंद्रकांत कवळे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलाने दिलेली "पप्पा उठा ना..." ही साद उपस्थितांच्या काळजाला आरपार चिरून गेली. या आर्त आवाजामुळे स्मशानभूमीत जमलेल्या हजारो जनसमुदायाला आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.

मैदानाचा 'वाघ' शांत झाला

​होळी येथील बैलगाडा मैदानात अंतिम फेरी झाल्यानंतर अमित कवळे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर गोरेगाव (वांगी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आखाड्यात बैलांना सुट्टी देताना ज्याचा आवाज घुमायचा, तो पहाडी आवाज आज कायमचा शांत झाला होता.

काळाचा क्रूर खेळ आणि तो चिमुरडा आवाज...

​अमित यांचे पार्थिव चितेवर असताना, त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांकडे मोठ्या आशेने पाहत होता. "पप्पा झोपलेत, ते आता उठतील" याच समजुतीने त्याने 'पप्पा, पप्पा उठा ना' म्हणून साद दिली. त्या निरागस मुलाला आपल्या डोक्यावरचे छत्र हरपले आहे, याचे भानही नव्हते. पण त्याचा तो 'पप्पा' हा शब्द तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवून गेला. नातेवाईक, मित्रपरिवार आणि बैलगाडा शौकीन या दृश्याने पूर्णपणे कोलमडून पडले.

आश्रूंना वाट मोकळी झाली

​कठोर काळजाचे पैलवानही आज त्या बालकाच्या आवाजाने ओक्साबोक्शी रडू लागले. घरातील महिलांचा आक्रोश आणि वृद्ध आई-वडिलांचे डोळे पुसण्याचे बळ कोणाकडेच नव्हते. संपूर्ण गोरेगाव परिसर शोकाकूल होता,गावाचा एक उमदा तरुण आणि बैलगाडा क्षेत्राचा आधारस्तंभ असा अकाली निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मैदान पोरके झाले

​अमित कवळे यांनी सुट्टी मेकर म्हणून केवळ नाव कमावले नव्हते, तर हजारो मित्र जोडले होते. त्यांच्या जाण्याने केवळ कवळे कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण बैलगाडा प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता, प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द होता - "अमित, तू खूप लवकर गेलास!"

कै. अमित कवळे यांचा रक्षा विसर्जन विधी उद्या, बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गोरेगाव (वांगी) येथे होणार आहे.

शब्दांजली:

ज्या मैदानात शड्डू ठोकला, तिथेच श्वास थांबला...

चिमुरड्याच्या त्या 'पप्पा' हाकेने, आज दगडही पाझरला!