साताऱ्याच्या तनुश्री भोसलेची भारतीय रग्बी संघाच्या कर्णधारपदी निवड
भारतीय महिला रग्बी संघाच्या नेतृत्वाची धुरा; साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला
10 November, 2026
साताऱ्याच्या तनुश्री भोसलेची भारतीय रग्बी संघाच्या कर्णधारपदी निवड
भारतीय महिला रग्बी संघाच्या नेतृत्वाची धुरा; साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला
सातारा ( jarandeshwar samachar) :-सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरावी अशी कामगिरी कु. तनुश्री श्वेता नितीन भोसले हिने केली आहे. भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली असून, भारतीय रग्बीच्या २० वर्षांच्या इतिहासात महिला रग्बी संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान तिला मिळाला आहे.
वेस्टर्न हिल्स फिटनेस अँड क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असलेल्या तनुश्री भोसले हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये ओडिशा येथे होणाऱ्या २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यानच्या रग्बी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तिची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
ओडिशा येथे झालेल्या सराव शिबिरामध्ये भारतीय रग्बी संघाच्या निवडीसाठी अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. देशभरातील उत्कृष्ट २९ खेळाडूंमधून अंतिम बारा महिला खेळाडूंची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत तनुश्रीने आपल्या खेळातील कौशल्य, नेतृत्वगुण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तिच्यावर भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तनुश्रीच्या या यशामागे वेस्टर्न हिल्स तसेच सातारा जिल्हा रग्बी असोसिएशनचे मोलाचे योगदान आहे. सातारा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विरभद्र कावडे, खजिनदार व प्रशिक्षक श्री. अंकुश (तात्या) जांभळे, प्रशिक्षक श्री. अजिंक्य जांभळे आणि सहप्रशिक्षक श्री. श्रीधर जाधव यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तनुश्रीने सातत्यपूर्ण सराव करून राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधारपदी तनुश्रीची निवड झाल्याचे वृत्त समजताच साताऱ्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध क्रीडा संघटनांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर मजल मारत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळविणाऱ्या तनुश्री भोसलेची कामगिरी राज्यातील युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आगामी स्पर्धेत भारतीय संघाला यश मिळवून देण्याच्या दृष्टीने तनुश्रीकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय