दिवाळीच्या मुहूर्तावर राहुल बर्गे यांची कर्मचाऱ्यांना अनोखी भेट!
कोरेगाव नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांना बोनस; तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा संपली, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव
07 November, 2026
दिवाळीच्या मुहूर्तावर राहुल बर्गे यांची कर्मचाऱ्यांना अनोखी भेट!
कोरेगाव नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांना बोनस; तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा संपली, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदोत्सव
कोरेगाव : दीपावलीचा सण ८ नोव्हेंबरपासून सुरू होत असताना कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी विशेष आनंदाची ठरली आहे. नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत कर्मचाऱ्यांना कधीही बोनस मिळाला नव्हता. मात्र, यंदा लोकप्रिय उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळाला असून, नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाळी म्हटली की प्रत्येक कुटुंबात आनंद, उत्साह आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. मात्र, सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात आर्थिक बळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. हीच बाब लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने बोनस मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे यंदा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
कोरेगाव नगरपंचायतीच्या स्थापनेपासून दहा वर्षांच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नसल्याची बाब कर्मचाऱ्यांनी राहुल बर्गे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि बोनससंदर्भातील मागणी समजून घेतली. केवळ आश्वासन न देता हा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रशासकीय आणि आर्थिक पातळीवर प्रयत्न सुरू केले.
आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करूनच घेतला निर्णय!
नगरपंचायतीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कर्मचाऱ्यांना बोनस देताना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी राहुल बर्गे यांनी विशेष काळजी घेतली. मागील वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक आणि चालू वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक यांची तुलना करून उपलब्ध निधी, उत्पन्न-खर्च आणि इतर आर्थिक बाबींचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. नगरपंचायतीच्या आर्थिक क्षमतेचा आढावा घेत नियमानुसार कर्मचाऱ्यांना बोनस कशा पद्धतीने देता येईल, याबाबत आवश्यक माहिती घेण्यात आली.
या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी प्रशासनाकडे सकारात्मक पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि तब्बल दहा वर्षांनंतर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळाला. त्यामुळे यंदाच्या दीपावलीत कर्मचाऱ्यांच्या घरातही आनंदाचा प्रकाश पोहोचला आहे.
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच खरे समाधान!
या निर्णयासाठी आमदार महेश शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनीही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. सर्वांच्या समन्वयातून हा निर्णय प्रत्यक्षात साकार झाल्याबद्दल राहुल बर्गे यांनी संबंधित सर्वांचे आभार मानले.
नगरपंचायतीच्या विकासासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळे शहराच्या विकासाबरोबरच या कर्मचाऱ्यांचे हित, त्यांचा सन्मान आणि त्यांचे न्याय्य हक्क जपणेही तितकेच आवश्यक आहे, अशी भूमिका राहुल बर्गे यांनी व्यक्त केली.
दहा वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या मनातील समाधान हेच आपल्यासाठी खरे यश असल्याची भावना राहुल बर्गे यांनी व्यक्त केली.
कामातून विश्वास आणि प्रयत्नांतून समाधान, या भूमिकेतून नगरपंचायतीच्या विकासासोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीही आपण सदैव सकारात्मक आणि कटिबद्ध राहणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या या निर्णयामुळे कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमधून उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या पुढाकाराचे समाधान व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय