टायगर इज कम बॅक! शशिकांत शिंदेंची राजकीय मैदानात दमदार पुनरागमनाची गर्जना
पदवीधर मतदारसंघातील दुहेरी विजयाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवी उभारी; मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांची फळी आणि शिंदेंच्या नेतृत्वाची राजकीय वर्तुळात चर्चा
01 November, 2026
टायगर इज कम बॅक! शशिकांत शिंदेंची राजकीय मैदानात दमदार पुनरागमनाची गर्जना
पदवीधर मतदारसंघातील दुहेरी विजयाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवी उभारी; मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांची फळी आणि शिंदेंच्या नेतृत्वाची राजकीय वर्तुळात चर्चा
Suresh Botalji -
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पक्षफुटी, सत्तांतर आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पक्ष संपला, संघटना कमकुवत झाली, आता या पक्षाला भवितव्य उरले नाही, अशा चर्चा करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात 'टायगर इज कम बॅक!' अशी चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दोन महत्त्वाच्या पदवीधर जागांवर विजय मिळवला. पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवत पक्षाची ताकद पुन्हा अधोरेखित केली. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मिळवलेले हे पहिले मोठे निवडणूक यश मानले जात आहे.
या विजयामागे केवळ निवडणुकीचे गणित नव्हते, तर संघटनात्मक बांधणी, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि सूक्ष्म नियोजन यांचा मोठा वाटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. शशिकांत शिंदे यांनी प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर दौरे करत कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. अनेक ठिकाणी बैठका, मेळावे आणि प्रचारयंत्रणेचे नियोजन करून त्यांनी निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई बनवले. त्याचा सकारात्मक परिणाम निकालातून दिसून आला.
मायक्रो प्लॅनिंगचा मास्टरस्ट्रोक!
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी केवळ मोठ्या सभा, भाषणे आणि नेत्यांची गर्दी पुरेशी नसते, तर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणारी सक्षम यंत्रणा उभी करावी लागते. शशिकांत शिंदे यांनी याच बाबीवर भर दिल्याचे दिसून आले. पदवीधर मतदारसंघातील मतदारांची मानसिकता, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदानाच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले.
शिक्षण, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि तरुणांचे प्रश्न हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे बनले. सुशिक्षित मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रक्रियेत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यामुळेच या विजयाकडे केवळ दोन जागांचे यश म्हणून न पाहता पक्षाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
साताऱ्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा?
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक प्रभावक्षेत्र मानला जातो. मात्र, पक्षफुटीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या राजकीय वाटा स्वीकारल्या. सत्तेची समीकरणे बदलली, काही ठिकाणी संघटनात्मक आव्हाने उभी राहिली. अशा परिस्थितीत शशिकांत शिंदे यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवत संघटना उभी करण्यावर भर दिला.
सातारा जिल्हा परिषदेत संख्याबळ आणि राजकीय ताकद असूनही सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. जिल्हा परिषद आणि स्थानिक राजकारणातील घडामोडींमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. काही राजकीय घडामोडी आजही सामान्य जनतेच्या चर्चेचा विषय आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील यशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय विरोधकांनी वेळोवेळी शशिकांत शिंदे यांना मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न केले, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. मात्र, प्रत्येक राजकीय आव्हानातून मार्ग काढत त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर विजयाची घोडदौड
या यशामध्ये शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच पक्षाच्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, महिला अध्यक्ष समिंदरताई जाधव, सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह वैशाली जाधव, जयश्री पाटील, नलिनी जाधव, सुनील काळेकर, अतुल शिंदे, सुवर्णाताई पाटील, नितीन शिंदे, प्रवीण धसके, रफिक शेख, प्रज्ञा गायकवाड, गोरख नलवडे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची साथही या विजयासाठी महत्त्वाची ठरली. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील आणि अन्य वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन पक्षाला लाभले. त्यामुळे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वयातून हा विजय साकारल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीही रंगीत तालीम?
पदवीधर मतदारसंघातील विजयामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीतील यशाचे विधानसभा निवडणुकीत रूपांतर करणे हे पक्षासमोरील पुढचे मोठे आव्हान असणार आहे.
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिंदे यांनी दाखवलेले नियोजन, कार्यकर्त्यांना दिलेला आत्मविश्वास आणि संघटनात्मक बांधणी याच पद्धतीने राज्यभर पक्षाची ताकद वाढवता आली, तर आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अधिक प्रभावीपणे मैदानात उतरू शकतो. या यशामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांचे पक्षांतर्गत स्थानही अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
जखमी वाघाची झेप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण?
एकेकाळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर पक्षफुटीनंतर अनेक आव्हाने उभी राहिली. सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांशी संपर्क कायम ठेवणे, पक्षाची भूमिका ठामपणे मांडणे आणि संघटना जिवंत ठेवणे हे सोपे नव्हते. मात्र, त्यांनी राजकीय संघर्ष सुरूच ठेवला. पदवीधर मतदारसंघातील विजयाने त्यांच्या नेतृत्वाला नवी धार मिळाल्याचे दिसून येते.
राजकारणात एखादा नेता किती मोठा आहे, हे केवळ त्याच्याकडे असलेल्या सत्तेवरून ठरत नाही; तर प्रतिकूल परिस्थितीत तो आपल्या कार्यकर्त्यांना किती ताकद देतो, यावरूनही ठरते. शशिकांत शिंदे यांनी या निवडणुकीतून हाच संदेश दिला आहे.
भाजपच्या प्रभावी निवडणूक यंत्रणेला आव्हान देत दोन महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवणे ही राष्ट्रवादीसाठी निश्चितच मोठी बाब आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणात शशिकांत शिंदे यांची भूमिका आगामी काळात अधिक महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
पक्ष संपला, अशी चर्चा करणाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत शशिकांत शिंदे यांनी राजकीय मैदानात पुन्हा एकदा दमदार झेप घेतली आहे. आता या विजयाची ऊर्जा संघटनात्मक विस्तारात आणि आगामी निवडणुकांतील यशात कितपत रूपांतरित होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 'टायगर इज कम बॅक' ही केवळ राजकीय घोषणा न राहता आगामी काळात प्रत्यक्ष राजकीय ताकदीत रूपांतरित होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय