सातवे येथील गावठाण प्लॉटधारकांसाठी दलित महासंघ आक्रमक; पन्हाळा तहसीलसमोर 'कागद फाड' आंदोलन
सातबारा नोंदीसाठी पन्हाळ्यात ठिय्या; दलित महासंघ आक्रमक, प्रशासनाकडून लेखी आश्वासन ;. पन्हाळा तहसीलसमोर घोषणाबाजीने परिसर दणाणला; गावठाण प्लॉटधारकांच्या हक्कासाठी 'कागद फाड' आंदोलन
28 March, 2026
सातवे येथील गावठाण प्लॉटधारकांसाठी दलित महासंघ आक्रमक; पन्हाळा तहसीलसमोर 'कागद फाड' आंदोलन
तहसीलदारांचे लेखी आश्वासन; प्रलंबित सातबारा नोंदीचा प्रश्न ऐरणीवर
पन्हाळा दि.२८ मार्च २०२६: जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा:-
पन्हाळा तालुक्यातील मौजे सातवे येथील वाढीव गावठाण प्लॉटधारकांच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ (वायदंडे गट) कमालीचा आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी आज कार्यकर्त्यांनी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत 'कागद फाड' आंदोलन छेडले. प्रशासनाने याप्रकरणी सकारात्मक लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
नेमके प्रकरण काय?
सन १९९१ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सातवे येथील गट क्रमांक १७१२/अ/१ मध्ये गावठाण वाढीव प्लॉट मंजूर करण्यात आले होते. त्यावेळी अनेक लाभार्थ्यांनी शासनाने ठरविलेली रक्कम भरून सातबाऱ्यावर आपली नावे लावून घेतली. मात्र, सुमारे ३० ते ३५ लाभार्थी आर्थिक अडचणीमुळे ही रक्कम भरू शकले नव्हते. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून या गरिबांच्या नावांची नोंद सातबाऱ्यावर प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले.
आंदोलनाचा पवित्रा
दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे व राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. "तात्काळ सातबाऱ्यावर नावे नोंदवावीत," अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी संताप व्यक्त करत तहसील कार्यालयासमोर 'कागद फाड' आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.
प्रशासनाची भूमिका
आंदोलनाची तीव्रता पाहून नायब तहसीलदार संजय वळवी व विजय जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा केली व निवेदनाचा स्वीकार केला. तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी या प्रकरणी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून शासन निर्णयानुसार लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच, गट क्रमांक १७१२/३/१ मधील ज्या प्लॉटधारकांना अद्याप 'सनद' मिळालेली नाही, त्यांचा प्रस्तावही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात सदाभाऊ चांदणे, सागर लोंढे, अमोल लोखंडे, प्रशांत डोईफोडे, गोरख सावंत, संभाजी पाटोळे, बजरंग सावंत, आदर्श कुंभार, प्रविण शिंदे, राहुल खोचिकर, स्वप्नील शेटे, मोहन निकम, आनंदा पाटील, युवराज जाधव यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी व प्लॉटधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!