single-post

सातारा जिल्हा परिषद : विषय समिती सभापती निवडीचा धुराळा; राजकीय ईर्ष्या की लोकशाहीचा सन्मान?

कामेश कांबळेंची भूमिका निर्णायक; कोणाचे पारडे जड? ​३३ विरुद्ध २७ : बहुमताचा आकडा की फोडाफोडीचे राजकारण? ​राजकीय 'चाणक्य' सक्रिय; फोडाफोडीच्या चर्चेने जिल्हा हादरला ​पूला खालून बरेच पाणी गेले; सावध पवित्रा कोणाला यश मिळणार!?

02 April, 2026

सातारा जिल्हा परिषद : विषय समिती सभापती निवडीचा धुराळा; राजकीय ईर्ष्या की लोकशाहीचा सन्मान?

सत्ताधाऱ्यांकडून 'फोडाफोडी'चा प्रयत्न तर विरोधकांचा 'जशास तसे' उत्तराचा पवित्रा | पोलिसांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

सातारा दि.२ एप्रिल २०२६: (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा)

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेला अभूतपूर्व राडा आणि पोलिसांच्या भूमिकेवरून झालेली 'नाचक्की' ताजी असतानाच, आता ४ एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मागील निवडीत भाजपने सत्तेचा गैरवापर करत लोकशाहीचा गळा घोटल्याची भावना सातारकरांमध्ये असून, यावेळी ही प्रक्रिया शांततेत पार पडणार की पुन्हा संघर्षाचा भडका उडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकशाहीचा 'बिहार' होवू देऊ नका!

​मागील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही, भाजपने यंत्रणेचा वापर करून दोन सदस्यांना मतदानापासून रोखले होते. भर जिल्हा परिषदेत दोन मंत्री आणि एका खासदाराला झालेली धक्काबुक्की सातारकरांना रुचलेली नाही. त्यातच सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याच्या तांत्रिक कारणावरून जिल्हा परिषद प्रशासन यांच्यावरील विश्वास उडाला आहे. "जे घडले ते बिहारपेक्षाही भयानक होते," अशी संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. त्यामुळे उद्याच्या निवडीत पोलिसांना आपली गेलेली अब्रू सावरण्याची शेवटची संधी आहे.

कामेश कांबळे ठरणार 'किंगमेकर'?

​संख्याबळाचा विचार करता शिवसेना-राष्ट्रवादी युती ३३ च्या आकड्यावर ठाम आहे. मात्र, खेड गटाचे सदस्य कामेश कांबळे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. कांबळे यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला साथ दिल्यास त्यांचे चारही सभापती निवडून येणे निश्चित आहे. मात्र, भाजपने पुन्हा एकदा 'टोकाचा' पवित्रा घेतल्यास गणिते बदलू शकतात. यावेळी मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेने 'सावध पवित्रा' घेत जशास तसे उत्तर देण्याची तयारी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आरक्षणाचा मुद्दा अन् ओबीसींचा रोष

​जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी समाजासाठी राखीव असतानाही, प्रस्थापित मराठा समाजाच्या व्यक्तीने ओबीसी दाखल्याचा आधार घेत त्या पदावर कब्जा केल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. या कृतीमुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला ओबीसींच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सभापतीपदासाठी कोणाची लागणार वर्णी? (संभाव्य चेहरे)

भाजपमधील रस्सीखेच :

  • शिक्षण व अर्थ : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांचे समर्थक राजेश पवार यांचे नाव आघाडीवर आहे. शंभूराज देसाईंच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यामुळे आणि पूर्वीचा अनुभव असल्याने त्यांना संधी मिळू शकते.
  • कृषी : अनुभवी दिलीप बाबर यांना संधी देऊन मकरंद आबा पाटील यांना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. याशिवाय धनंजय चव्हाण हे देखील स्पर्धेत आहेत.
  • समाजकल्याण : खंडाळा तालुक्यातील ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उत्सुक आहेत. तर धैर्यशील कदम हे सागर शिवदास यांच्यासाठी आग्रही आहेत.
  • महिला व बालकल्याण : या पदासाठी तेजस्विनी कदम किंवा ना. जयकुमार गोरे यांच्या भावजय सोनल गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच विद्या वेताळ आणि मनीषा पाटील यांची नावेही शर्यतीत आहेत.

सेना-राष्ट्रवादीची व्यूहरचना :

जर संख्याबळाचे गणित जुळले, तर सत्ताधाऱ्यांना कडवे आव्हान देण्यासाठी सेना-राष्ट्रवादीकडून तगडे उमेदवार दिले जातील.

  • राष्ट्रवादीकडून : अनिल देसाई, उदयसिंह पाटील उंडाळकर, संदीप मांडवे, सोनाली पोळ, ऋतुजा शिंदे.
  • शिवसेनेकडून : सह्याद्री कदम, अजित सपकाळ, कविता ओंबळे, मृणाल पाटील, रूपाली सरगर.

​उद्याच्या या निवडीत सातारा जिल्ह्याची राजकीय दिशा ठरणार असून, प्रशासनाने आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून पारदर्शकता जपण्याचे आवाहन सर्वसामान्य सातारकरांमधून केले जात आहे.