कोरेगाव अंधारात; नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! थकीत वीजबिलामुळे शहरात 'ब्लॅकआऊट'; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
प्रशासनाचा 'रामभरोसे' कारभार; शहरात काळोख अन् मुख्याधिकारी अनभिज्ञ! करवसुलीत 'वाघ' असणारी नगरपंचायत वीजबिल भरताना 'गिधाड' का? कोरेगावच्या विकासाला उतरती कळा; आदर्श शहराचे स्वप्न अंधारात विरले!
01 April, 2026
कोरेगाव अंधारात; नगरपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
थकीत वीजबिलामुळे शहरात 'ब्लॅकआऊट'; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतापले
कोरेगाव दि.१ एप्रिल 202६| (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
आदर्श शहराचे स्वप्न दाखवणाऱ्या कोरेगाव नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण शहर गेल्या दोन दिवसांपासून अंधारात बुडाले आहे. थकीत वीजबिलापोटी वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने मुख्य रस्त्यांसह उपनगरांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांकडून नियमित करवसुली करूनही वीजबिल का थकले? असा संतप्त सवाल विचारला जात असून, या 'अंधारयुगा'ला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशासकीय 'अंधार': मुख्याधिकाऱ्यांना माहितीच नाही!
शहरातील पथदिवे बंद असल्याबाबत जेव्हा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना याबाबत माहितीच नसल्याचे धक्कादायक उत्तर मिळाले. शहराचा कारभारीच जर अनभिज्ञ असेल, तर प्रशासनाचा वचक राहिलाय कुठे? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि उदासीनता यामुळेच कोरेगावकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप: सत्ताधारी रडारवर
या गंभीर विषयावरून राजकीय वातावरणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे, कार्यकर्ते गणवेश धनावडे आणि प्रीतम बर्गे यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. नगरपंचायतीने वीजबिल न भरल्यामुळेच ही नामुष्की ओढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोट्यवधींचा महसूल जमा होऊनही मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश येणे, हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका त्यांनी केली.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- चोरीची भीती: पूर्ण शहर अंधारात असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण?
- पावसाचा फटका: पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झाले असताना पथदिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
- कर भरूनही सुविधा शून्य: "आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेवर भरतो, मग आम्हाला अंधारात का ठेवले जाते?" असा आक्रमक सवाल सामान्य जनता विचारत आहे.
आदर्श कोरेगावचा लौकिक धोक्यात!
कधीकाळी राज्यात आपल्या विकासासाठी आदर्श ठरलेली कोरेगाव ग्रामपंचायत, आज नगरपंचायत झाल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप, आंदोलने आणि प्रशासकीय अनियमितता यामुळे बदनाम होत आहे. केवळ घोषणाबाजी आणि श्रेयवादाच्या लढाईत सामान्य कोरेगावकर भरडला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
मागणी काय?
शहरातील पथदिवे येत्या २४ तासांत सुरू न झाल्यास आणि थकीत बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. तसेच, या बेजबाबदार कारभाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!