सातारा झेडपी राडा प्रकरण : CCTV फुटेजचा 'खो'; प्रशासनाचा 'पीओपी'चा बनाव! काम करताना वायर तुटल्याचा अजब दावा; पुरावे नष्ट करण्यासाठी प्रशासकीय 'शक्कल'?
पीओपीचे काम की पुराव्यांवर 'पाणी' फिरवण्याचा प्रयत्न? वायर तुटली की तोडली? सातारकरांचा थेट सवाल! प्रशासनाचा 'अजब' दावा; सीसीटीव्ही फुटेज मिळणे अशक्य! दोषींवर कारवाईची मागणी; पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष!
31 March, 2026
सातारा झेडपी राडा प्रकरण : CCTV फुटेजचा 'खो'; प्रशासनाचा 'पीओपी'चा बनाव!
काम करताना वायर तुटल्याचा अजब दावा; पुरावे नष्ट करण्यासाठी प्रशासकीय 'शक्कल'?
सातारा दि.३१ मार्च 2026| (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या राड्याच्या चौकशीत आता प्रशासनाने एक नवीनच 'फाईल' उघडली आहे. ज्या महत्त्वाच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजची गरज होती, त्याच वेळी 'पीओपी (POP) चे काम सुरू असताना वायर तुटल्याने' कॅमेरे बंद होते आणि फुटेज मिळू शकत नाही, असा अजब दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाचा हा दावा म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असून, पुरावे जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा संशयाचा धूर आता साताऱ्यात निघू लागला आहे.
काय आहे प्रशासनाचे म्हणणे?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद इमारतीत काही ठिकाणी पीओपीचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना सीसीटीव्हीची मुख्य वायर तुटली आणि त्यामुळे त्या दिवशीची कोणतीही रेकॉर्डिंग उपलब्ध होऊ शकत नाही, असे लेखी स्पष्टीकरण प्रशासनाकडून दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील दिवशी इतकी मोठी तांत्रिक चूक कशी होऊ शकते? आणि ती दुरुस्त का केली गेली नाही? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यातच आहे.
नियोजित बनाव की तांत्रिक बिघाड?
पीओपीच्या कामाचे निमित्त पुढे करून सीसीटीव्ही फुटेज 'गायब' करणे, हे सातारकरांच्या पचनी पडणारे नाही. साताऱ्यातील जनता अत्यंत हुशार आणि राजकीयदृष्ट्या जागरूक आहे, हे प्रशासन विसरलेले दिसते.
- ऐन निवडणुकीच्या वेळीच पीओपीची वायर कशी तुटली?
- इतक्या मोठ्या वास्तूचे सीसीटीव्ही बॅकअप आणि मेंटेनन्स कंत्राटदारावर कारवाई का नाही?
- जर यंत्रणा बंद होती, तर पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही?
कायदेशीर पेच आणि तपासाची दिशा
प्रशासनाने दिलेले हे 'तर्कट' कायदेशीर तपासात किती टिकेल, याबाबत शंका आहे. सीसीटीव्ही फुटेज हा तपासाचा मुख्य आधार असताना, तोच 'तांत्रिक बिघाडा'च्या नावाखाली नाकारणे, हा तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्री या 'पीओपी'च्या कारणाची शहानिशा करणार की दोषींना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड्याचा मान विठ्ठल कदमांना!