single-post

दिव्यांगांना कोरेगाव नगरपंचायतीचा भक्कम आधार; १४५ लाभार्थ्यांना आर्थिक निधीचे वितरण

आर्थिक सक्षमतेसाठी पुढाकार: १४५ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी २,२५० रुपयांच्या निधीचे वाटप. ​सामाजिक बांधिलकीचा आदर्श: कोरेगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना मदतीचा हात.

26 March, 2026

दिव्यांगांना कोरेगाव नगरपंचायतीचा भक्कम आधार; १४५ लाभार्थ्यांना आर्थिक निधीचे वितरण

कोरेगाव : दि.२६ मार्च 2026 (जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा):-

सामाजिक बांधिलकी जोपासत कोरेगाव नगरपंचायतीने यंदाही दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला आहे. नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमांतर्गत शहरातील एकूण १४५ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार २५० रुपयांच्या आर्थिक सहाय्य निधीचे नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले.

​दिव्यांग नागरिकांना सक्षम बनविणे, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त करणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. पात्र लाभार्थ्यांची पारदर्शक निवड करून त्यांना ही थेट आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. नगरपंचायतीचा हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी  कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. दिपालीताई महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे आणि मुख्याधिकारी प्रताप कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेविका शितल संतोष बर्गे, स्नेहल अर्जुन आवटे, संगीता नितीन ओसवाल, नगरसेवक राजेंद्र वैराट, ॲड. अमोल भुतकर यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जागरूकतेची गरज

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली. उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान सर्व लाभार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

भविष्यातील संकल्प

"भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून दिव्यांगांना आधार देण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध राहील," असा संकल्प उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.