single-post

महागाईचा भडका अन् इंधन संकट; सामान्यांचा कोंडमारा!

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; पंपांवर रांगा, 'नो स्टॉक'च्या फलकांमुळे 'लॉकडाऊन'ची धास्ती

25 March, 2026

महागाईचा भडका अन् इंधन संकट; सामान्यांचा कोंडमारा!

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; पंपांवर रांगा, 'नो स्टॉक'च्या फलकांमुळे 'लॉकडाऊन'ची धास्ती

दि.२५ मार्च 2026 (​जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा) | सातारा कोल्हापूर/पुणे:-

आधीच महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या जखमेवर आता इंधन टंचाईने मीठ चोळले आहे. गॅस सिलिंडरसह पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे कंबरडे मोडले असतानाच, आता राज्यात अनेक ठिकाणी इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. कित्येक पंपांवर 'इंधन उपलब्ध नाही'चे फलक झळकत असून, जिथे इंधन उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. या विदारक चित्रामुळे पुन्हा एकदा 'लॉकडाऊन'चा काळ आठवू लागला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

इंधन 'कट'चा दुहेरी मार

​महागाईने हैराण झालेल्या वाहनधारकांना आता फसवणुकीचाही सामना करावा लागत आहे. अनेक पंपांवर पेट्रोल कमी भरले जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे खिशाला चाट आणि दुसरीकडे हक्काच्या इंधनातही 'कट' अशा दुहेरी कत्रीत सर्वसामान्य अडकला आहे. काही ठिकाणी केवळ १ ते २ लिटरच इंधन दिले जात असल्याने नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्यांचे हाल होत आहेत.

युद्धाचे ढग आणि पुरवठ्याची कोंडी

​या जागतिक संकटामुळे स्थानिक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारत हा इंधन आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या घडामोडींचे थेट पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत.

प्रमुख ठळक मुद्दे:

  • ओस पडलेले रस्ते: इंधन नसल्याने खासगी वाहतूक व्यवस्था कोलमडली असून रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
  • लांबच लांब रांगा: सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनधारकांनी गर्दी केल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
  • आर्थिक फटका: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारल्याने आगामी काळात महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​जर ही स्थिती अशीच राहिली, तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक युद्धाची ही ठिणगी भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट घेऊन आली आहे.