कोरेगाव तालुक्याचा अखेर दुष्काळग्रस्त यादीत समावेश! प्रथम नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा
14 October, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव दि.१४ ऑक्टोबर २०२६ : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा अखेर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. राज्य शासनाच्या यापूर्वीच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत कोरेगावचा समावेश नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, शिवसेनेने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सातत्याने मांडला. या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा बर्गे यांनी केला आहे.
राज्य शासनाने यापूर्वी राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. मात्र, या यादीत कोरेगाव तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाच्या कमतरतेमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असतानाही तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळाले नसल्याने शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शेतशिवारातील परिस्थिती शासनाच्या निदर्शनास
कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. स्टेशन परिसरासह जांब बुद्रुक, भिवडी पुनर्वसित, त्रिपुटी, दरे पुनर्वसित आदी गावांमध्ये पावसाअभावी शेतीसमोरील अडचणी गंभीर असल्याचे निदर्शनास आले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे बर्गे यांनी सांगितले.
या परिस्थितीचा अहवाल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर करण्यात आला. देसाई यांनी या प्रश्नाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवली. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे बर्गे यांनी स्पष्ट केले.
‘ट्रिगर-२’ निकषांनुसार समावेशाची मागणी
दुष्काळ निश्चितीच्या ‘ट्रिगर-१’ निकषांमध्ये कोरेगाव तालुक्याचा समावेश झाला नव्हता. मात्र, पावसाची कमतरता आणि त्याचा पिके व वनस्पतींवर झालेला प्रत्यक्ष परिणाम लक्षात घेऊन ‘ट्रिगर-२’ निकषांनुसार तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती.
तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे बर्गे यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळू शकणाऱ्या सवलती
दुष्काळग्रस्त म्हणून समावेश झाल्यानंतर शासनाच्या लागू नियमांनुसार आणि पात्रतेच्या अटींनुसार शेतकऱ्यांना विविध सवलती मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होऊ शकतो.
- जमीन महसुलात सूट.
- पीककर्जाच्या परतफेडीचे पुनर्गठन.
- शेतीशी संबंधित कर्जवसुलीबाबत नियमानुसार सवलती.
- कृषिपंपांच्या वीजबिलाबाबत लागू तरतुदींनुसार सवलत.
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत नियमानुसार माफी.
या सवलतींची अंमलबजावणी शासनाच्या अधिकृत आदेशांनुसार आणि पात्रतेच्या निकषांनुसार होणार आहे.
पाणी, चारा आणि रोजगाराच्या उपाययोजनांकडे लक्ष
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याबाबत लागू निर्देशांची अंमलबजावणी करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे हाती घेणे आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, अशा उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.
तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने शेतकरी, दूध उत्पादक, शेतमजूर आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत व सवलतींचा लाभ मिळण्यासाठी संबंधित शासन निर्णय, निकष आणि अंमलबजावणीचे आदेश महत्त्वाचे ठरणार आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना
कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
— जरंडेश्वर समाचार
सामान्य जनांचा बुलंद आवाज
www.jarandeshwarsamachar.com

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय