कोरेगावात अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जनजागरण अभियान राबविणार- सुरेश बोतालजी
जुना मोटार स्टँड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या जागेवरच पुतळा उभारण्याची प्रमुख मागणी; प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याची मागणी
25 September, 2026
जरंडेश्वर समाचार
कोरेगाव, दि. २५ जरंडेश्वर समाचार वृत्त जनसेवा : कोरेगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने आता या मागणीसाठी व्यापक जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. कोरेगाव येथील जुना मोटार स्टँड परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीची जागा जिल्हा परिषदेकडून नियमानुसार हस्तांतरित करून, त्याच ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, ही या अभियानातील प्रमुख मागणी असल्याची माहिती लोक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी दिली.
कोरेगाव नगरपंचायतीने जुना मोटार स्टँड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीची जागा अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे. त्यामुळे आता या जागेबाबत कोणतीही अनावश्यक कारणे न देता संबंधित विभागांनी नियमानुसार कार्यवाही करावी आणि पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जुना मोटार स्टँडची जागा पुतळ्यासाठीच द्यावी
कोरेगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना मोटार स्टँड परिसरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीची जागा ही पुतळा उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. जिल्हा परिषद आणि कोरेगाव नगरपंचायतीने परस्पर समन्वयाने आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ही जागा पुतळा उभारणीसाठी हस्तांतरित करावी, अशी मागणी मातंग समाज बांधव व लोक पँथरच्या वतीने करण्यात येत आहे.
पुतळा उभारणीसाठी जागेची मालकी, हस्तांतरण किंवा वापराचा अधिकार, बांधकाम परवानगी तसेच शासनाच्या पुतळा धोरणानुसार आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुतळा उभारणीचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव शासनाकडे पाठवा
कोरेगाव नगरपंचायतीची विद्यमान मुदत ९ फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसंदर्भातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“नगरपंचायतीची मुदत संपण्यास काही कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता जुना मोटार स्टँड येथील जिल्हा परिषदेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून पुतळा उभारणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा,” अशी मागणी सुरेश बोतालजी यांनी केली.
पुतळ्यासोबत ग्रंथालय, यूपीएससी-एमपीएससी सेंटरची मागणी
केवळ पुतळा उभारण्यापुरती मागणी मर्यादित न ठेवता, त्याच ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुसज्ज ग्रंथालय, यूपीएससी-एमपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल उभारण्यात यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी वाचनालयाची सुविधा मिळावी, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे बोतालजी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
पुतळा उभारणीसह या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोरेगाव नगरपंचायतीने पुतळा उभारणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील रिक्त जागा भरून काढाव्यात आणि अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत शासनाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, या मागण्याही जनजागरण अभियानात करण्यात येणार आहेत.
उपवर्गीकरणाचा डाटा जाहीर करण्याची मागणी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात शासनाने कोणता मसुदा तयार केला आहे, कोणते निकष निश्चित केले आहेत आणि कोणत्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे उपवर्गीकरण केले जाणार आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी लोक पँथरकडून करण्यात येणार आहे.
शासनाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आणि उपलब्ध अधिकृत डेटा जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे.
कोरेगाव शहरातून जनजागरणाला प्रारंभ
आचारसंहिता संपल्यानंतर नव्हे, तर आचारसंहितेपूर्वी आवश्यक प्रशासकीय प्रस्ताव पाठविण्याची मागणी करत, त्यानंतर निर्धारित नियमानुसार कोरेगाव शहरातून जनजागरण अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती गणनिहाय जनजागरण अभियान राबविण्यात येणार असल्याचे बोतालजी यांनी सांगितले.
मतदारसंघातील मातंग समाजाच्या विविध वाड्या-वस्त्यांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे. काही ठिकाणी बैठका, तर काही ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असून, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
या अभियानामध्ये मातंग समाजाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
व्यापक जनआंदोलनाचा इशारा
जनजागरण अभियान पूर्ण झाल्यानंतर विविध घटकांचे प्रतिनिधित्व असलेले शिष्टमंडळ तयार करण्यात येणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुतळा उभारणीसह विविध मागण्यांवर चर्चा करणार आहे.
त्यानंतर कोरेगाव शहरात मातंग समाजाची भव्य परिषद . ’ आयोजित करण्यात येणार असल्याचेही सुरेश बोतालजी यांनी सांगितले.
“कोरेगाव नगरपंचायतीने जुना मोटार स्टँड येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीची जागा नियमानुसार हस्तांतरित करून त्याच ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. पुतळा उभारणीच्या मागणीबाबत कोणतीही अनावश्यक कारणे देऊन विलंब करण्यात येऊ नये. नगरपंचायतीने आणि संबंधित प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा या मागणीसाठी व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा लोक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बोतालजी यांनी दिला.
या अनुषंगाने कोरेगाव नगरपंचायतीला दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी निवेदन सादर करणार आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय