single-post

पालकमंत्री शंभूराज देसाई शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम

वाठार स्टेशन परिसरात दुष्काळी परिस्थितीची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत दिले मदतीचे आश्वासन

24 September, 2026

जरंडेश्वर समाचार 

वाठार स्टेशन, दि. २४जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा:: सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक भागांतील पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून विहिरींची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याबरोबरच आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार की नाही, याची चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, युवराज पाटील, गणेश शेळके, संदीप निकम यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाठार स्टेशन परिसरातील शेतीची पाहणी करताना पालकमंत्री देसाई यांनी शेतकऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. पावसाअभावी पिकांची झालेली अवस्था, आटलेल्या विहिरी, सिंचनासाठी निर्माण झालेली पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिके करपली असून उर्वरित पिकेही पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी शेतकरी वर्गातून करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. दुष्काळी परिस्थितीचा शासनस्तरावर आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत असल्याचे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पावसाने आणखी दडी मारल्यास उत्तर सातारा भागातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा प्रश्न याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.