पाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाच्या गुणवत्तेबाबत जिल्हा परिषदेची कठोर भूमिका
४,८४३ चौरस फुटांचा निकृष्ट स्लॅब पाडून ठेकेदारामार्फत स्वखर्चाने नव्याने बांधण्याच्या सूचना
23 September, 2026
सातारा, दि. २३ सप्टेंबर २०२६ जरंडेश्वर समाचार वृत्त जनससेवा:
कराड तालुक्यातील पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची सातारा जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम समितीचे सभापती श्री. राजू भैय्या यांनी संबंधित कामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी नियुक्त करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी तसेच आवश्यक गुणवत्ता चाचण्या करून घेतल्या.
या तपासणीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतील सुमारे ४,८४३ चौरस फूट क्षेत्रफळाच्या स्लॅबच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच संबंधित स्लॅबचे काम अपेक्षित गुणवत्तेच्या निकषांनुसार झाले नसल्याचे चौकशी व गुणवत्ता तपासणीमध्ये आढळून आले.
चौकशी अहवाल आणि गुणवत्ता तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे सातारा जिल्हा परिषदेने संबंधित ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ४,८४३ चौरस फूट क्षेत्रफळाचा गुणवत्तेच्या निकषांनुसार न झालेला स्लॅबचा भाग पाडून, तो ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने नव्याने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने बांधावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय इमारतीच्या उर्वरित भागामध्ये ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथेही आवश्यक त्या दुरुस्तीच्या उपाययोजना ठेकेदाराने स्वखर्चाने कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
खराब स्लॅब पाडण्याच्या कामाला सुरुवात
जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार संबंधित ठेकेदारामार्फत खराब गुणवत्तेचा स्लॅब पाडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय निधीतून सुरू असलेल्या या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेली भूमिका स्पष्ट झाली आहे.
गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही
सातारा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि निर्धारित बांधकाम निकषांचे पालन याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कामाच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडून आवश्यक त्या दुरुस्तीची कामे त्याच्या स्वखर्चाने करून घेण्यात येतील. तसेच विकासकामांची गुणवत्ता योग्य पद्धतीने राखली जात आहे की नाही, यासाठी आवश्यक त्या टप्प्यांवर तपासणी आणि गुणवत्ता चाचण्या करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
“सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा उत्तम राहणे ही जिल्हा परिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामातील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधित ठेकेदारालाच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आल्याने, विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय