वाई जनता अर्बन बँकेवर परिवर्तन पॅनलचा झेंडा
खा. नितीन पाटील (काका)यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव; मतदान झालेल्या सर्व १० जागांवर उमेदवार विजयी
22 September, 2026
वाई जनता अर्बन बँकेवर परिवर्तन पॅनलचा झेंडा
खा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव; मतदान झालेल्या सर्व १० जागांवर उमेदवार विजयी
वाई दि.२२ सप्टेंबर विशेष 26 जनश्वर समाचार वृत्त जनसेवा : जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., वाईच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मतदान झालेल्या सर्व दहा जागांवर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. अनुसूचित जाती प्रवर्गातील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. त्यामुळे संचालक मंडळाच्या एकूण ११ जागांवर परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.
खा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनलने निवडणुकीची रणनीती आखली होती. प्रचाराच्या काळात उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी सभासदांच्या प्रत्यक्ष भेटी घेत बँकेच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपली भूमिका मांडली. त्याला सभासदांनी मतदानातून प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
दि. २० सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानात ५,२७८ सभासदांनी मतदान केले. त्यानंतर दि. २१ सप्टेंबर रोजी मतमोजणी पार पडली. मतमोजणीचा निकाल जाहीर होताच परिवर्तन पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सहा जागांवर सर्वसाधारण गटाचे उमेदवार
सर्वसाधारण मतदारसंघातून महेंद्र नामदेव जमदाडे, तानाजी किसन जाधव, राहुल मधुकर डेरे, सुभाष बापूराव नवले, शेखर हणमंत फरांदे आणि निळकंठ मधुकर मोरे यांनी विजय मिळविला.
महिला उमेदवारांचाही विजय
महिला राखीव मतदारसंघातून वैशाली नीलेश चव्हाण आणि रेखा संतोष पिसाळ यांनी बाजी मारली. दोन्ही जागा परिवर्तन पॅनलच्या खात्यात गेल्या.
तर अजय जगन्नाथ गायकवाड यांनी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जागेवर विजय मिळविला. बाळकृष्ण भिकोबा सपकाळ यांनी इतर मागास प्रवर्गातील जागा जिंकली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या अखेरीस बँकेच्या संचालक मंडळातील सर्व ११ जागांवर परिवर्तन पॅनलचे प्रतिनिधित्व राहणार आहे.
‘रिक्षा’ चिन्ह ठरले लक्षवेधी
परिवर्तन पॅनलने ‘रिक्षा’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली. ‘विश्वासाची परंपरा जपूया, प्रगतीची नवी दिशा घडवूया!’ हा संदेश घेऊन पॅनलने सभासदांशी संवाद साधला.
निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंद साजरा केला. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी खा. नितीन पाटील यांची भेट घेत त्यांचा सत्कारही केला.
नव्या संचालक मंडळाकडून अपेक्षा वाढल्या
निवडणुकीतील विजयामुळे परिवर्तन पॅनलसमोर आता सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आली आहे. बँकेचा कारभार पारदर्शक ठेवणे, सभासदांचे हित जपणे, आर्थिक व्यवहार अधिक सक्षम करणे आणि बँकेच्या प्रगतीला गती देणे, या बाबींवर नव्या संचालक मंडळाची पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.
सभासदांनी दाखविलेला विश्वास कायम ठेवून बँकेच्या हितासाठी काम करण्याची भूमिका परिवर्तन पॅनलच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
दि. २२ सप्टेंबर २०२६ | जरंडेश्वर समाचार | वाई

गणेशोत्सवात. कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय